नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीशी संबंधित खटल्याची सुनावणी १४ एप्रिल रोजी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मशिदीच्या आवारात वजू करण्यास परवानगी देण्याबाबत मुस्लिम पक्षकाराला अर्ज दाखल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करताना, वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी म्हटले की "हा रमजानचा महिना आहे आणि उपासकांना मशीद आवारात नमाज अदा करता आली पाहिजे." त्यावर सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांनी या संदर्भात अर्ज दाखल करण्यास सांगितले, असे Bar & Bench ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी शिवलिंग आढळले होते; त्या ठिकाणी धार्मिक विधी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका याआधी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कृष्ण जन्मभूमी मुक्ती दलाचे अध्यक्ष राजेश मणी त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली होती. सर्वेक्षणादरम्यान मिळालेले 'शिवलिंग' न्यायालयाने आदेश पारित करीत संरक्षित केले आहे. पण शिवलिंग संरक्षित करण्यात आल्यानंतर देखील भाविकांना, शिवभक्तांना येथे पुजा-अर्चना करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असा युक्तीवाद करण्यात आला होता.
१७ मे २०२२ रोजी दिलेला अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत शिवलिंग आढळलेल्या ठिकाणाला संरक्षित करण्याचे तसेच मुस्लीम बांधवांच्या नमाज पठण तसेच इतर धार्मिक अनुष्ठानावर कुठलीही बंदी न घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मशीद परिसरात देवी-देवतांची पुजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या हिंदू महिलांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित केली होती.
हे ही वाचा :