सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र ) 
Latest

नमाज पठणासाठी महिलांनाही मिळू लागलाय प्रवेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात 2020 मध्ये दाखल झालेल्या याचिकेनंतर आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दाखल केलेल्या सकारात्मक प्रतिज्ञापत्रानंतर मुस्लिम महिलांना नमाज पठणासाठी मस्जिदीमध्ये प्रवेश मिळू लागला असल्याची माहिती याचिककर्त्याचे पती अन्वर शेख यांनी देताना सर्व समाजाची मानसिकताही पूर्णपणे बदलेल, अशी आशा दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
सध्या देशभरात मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका महत्त्वाची मानली जात आहे. अन्वर शेख आणि त्यांची पत्नी फरहान शेख अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत.

याप्रकरणात 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात महिलांना नमाज पठणासाठी मस्जिदीमध्ये प्रवेश मिळावा, साठी बोपोडी येथे राहणार्‍या शेख दाम्पत्याने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासहीत, बोपोडीतील स्थानिक मस्जिद आणि इतरांना प्रतिवादी केले होते. दरम्यान, कोरोनाच्या कालावधीत सुनावणी लांबणीवर पडली. 2022 मध्ये या याचिकवेरील सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. त्याअंतर्गत सर्वांना पुन्हा नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते.

त्याच धर्तीवर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने महिलांना प्रवेश मिळण्याच्या दृष्टींने अटी व शर्ती नमूद करीत सकारात्मक प्रतिज्ञापत्र फेब्रुवारी महिन्यात दाखल केले होते. त्यानुसार शेख दाम्पत्याने पुण्यातील 300 हून अधिक मस्जिदींना पत्र पाठवून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने उचललेल्या सकारात्मक पावलाबद्दल पत्राद्वारे कळवले. त्यानंतर मस्जिदींनी महिलांना काही ठिकाणी प्रवेश देणे सुरू केल्याचे अन्वर शेख यांनी सांगितले. 'ईद मुबारक'बरोबरच 'प्रवेश मुबारक' ही समाजहितपर शुभेच्छा आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

…म्हणून केली याचिका दाखल
अन्वर शेख आणि त्यांची पत्नी फरहान शेख हे पुण्यातल्या बोपोडी भागात राहतात. हे दाम्पत्य गेल्या वर्षी रमजान महिन्यात पुण्यात कॅम्प भागात होते. ते खरेदीसाठी येथे गेले. नमाज अदा करण्याची वेळ आली. तेव्हा हे पती-पत्नी एका मशिदीजवळ गेले. तेव्हा फक्त अन्वर शेख यांना मशिदीत प्रवेश मिळाला. फरहान यांना बाहेर पावसात उभे राहावे लागले होते.

आता निर्णयाची वाट
पुण्यातल्या बोपोडीमध्ये मुस्लिम महिलांना मशिदीच्या व्यवस्थापनाने नमाज पठणाची वेगळी सोय केली आहे. मात्र, सध्या फक्त याच मशिदीमध्ये ही परवानगी मिळाली आहे. आता अन्वर आणि फरहान शेख या दाम्पत्याने देशभरातल्या मशिदीत मुस्लिम महिलांसाठी नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT