Latest

SRH vs PBKS : धवनची एकाकी झुंज निष्फळ; हैदराबादचा एकतफीर्र् विजय

Shambhuraj Pachindre

हैदराबाद; वृत्तसंस्था : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाबाद 99 धावांची खेळी साकारल्यानंतरही त्याला अन्य एकाही सहकार्‍याची साथ न लाभल्याने याचा संघाला फटका बसला आणि आयपीएल साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबादने 8 गडी व 17 चेंडूंचा खेळ बाकी राखत अगदीच एकतर्फी विजय नोंदवला. (SRH vs PBKS )

विजयासाठी 144 धावांचे आव्हान असताना हॅरी ब्रूक (13) व मयंक अग्रवाल (21) यांनी 3.5 षटकांत 27 धावांची सलामी दिली. मयंक दुसर्‍या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी हैदराबादने 8.3 षटकांत 2 बाद 45 अशी जेमतेम मजल गाठली होती. मात्र, त्यानंतर राहुल त्रिपाठी व एडन मारक्रम यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवत एकतर्फी विजय संपादन करून दिला. राहुल त्रिपाठी 48 चेंडूंत 10 चौकार, 3 षटकारांसह 74 तर मारक्रम 21 चेंडूंत 6 चौकारांसह 37 धावांवर नाबाद राहिले. या जोडीने तिसर्‍या गड्यासाठी 100 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. पंजाबतर्फे सॅम कुरेन व राहुल चहर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (SRH vs PBKS)

धवनची फटकेबाजी 

तत्पूर्वी, डावखुरा कर्णधार शिखर धवनने नाबाद 99 धावांच्या खणखणीत खेळीसह आपला फॉर्म पुन्हा एकदा अधोरेखित केला असला तरी काही प्रमाणात सॅम कुरेन (22) वगळता अन्य सर्व फलंदाजांनी निव्वळ निराशाच केली. यानंतर पंजाब किंग्जला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 143 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले.

डावखुर्‍या शिखर धवनची धुवाँधार फलंदाजी हे या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. धवनने चौफेर फटकेबाजी करत आपल्या वैभवशाली कारकिर्दीच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. त्याने आपल्या भात्यातील एकापेक्षा एक फटक्यांची जणू बरसात करत हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरश: 'सळो की पळो' करून सोडले. डावातील शेवटच्या षटकात शतकासमीप आल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर त्याला नाबाद 99 धावांपर्यंत पोहोचता आले.

हैदराबादने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. मॅथ्यू शॉर्ट (1), जितेश शर्मा (4), सिकंदर रझा (5), एम. शाहरुख खान (4) हे आघाडीचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. केवळ शिखर धवन व सॅम कुरेन या दोघाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : 20 षटकांत 9 बाद 143. (शिखर धवन नाबाद 99, सॅम कुरेन 22. मयंक मार्कंडे 4/15, उमरान मलिक 2/32, मार्को जॉन्सन 2/16.)

सनरायझर्स हैदराबाद : 17.1 षटकांत 2 बाद 145. (राहुल त्रिपाठी नाबाद 74, मार्करम नाबाद 37. अर्शदीप व राहुल चहर प्रत्येकी एक बळी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT