सातारा : पुढारी वृत्तसेवा : शालेय परीक्षा आता बर्यापैकी उरकल्या असून, आजपासून बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. गेल्या काही वर्षांतील सुट्टींत घडलेल्या अप्रिय घटना व नुकताच गवडी, ता. सातारा येथे पोहताना दोन चिमुरड्यांचा गेलेला जीव अशा हृदयद्रावक घटनांनी मन हेलावून जाते. सुट्टीत खेळता-बागडताना हकनाक गेलेले बळी काळजी वाढवणारे आहेत. साथीचे बळी, उष्म्याचे बळी, दुष्काळाचे बळी जसे जातात तसेच आता सुट्टीचेही बळी जाऊ लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करताना अनेक बालके व चिमुरड्यांचा हकनाक बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पोटच्या गोळ्याचा अन् निष्पाप मुलांचा जीव जाताना पाहिला की हृदयाचा ठाव चुकल्याशिवाय राहत नाही. अनेकदा पालकांचे दुर्लक्षच अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खेळणार्या, बागडणार्या मुलांच्या आनंदावर विरजण पडू नये व उद्याचे भविष्य असलेल्या चिमुरड्यांचे जीव वाचवण्यासाठी आता पालकांनीच मुलांच्या खेळण्याकडे व सुट्टीतील त्यांच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सुट्टी म्हणजे बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मग ती सुट्टी कोणतीही असो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट. सुमारे दोन महिने मौज-मजा अन् मस्तीच. शहरी भागात उन्हाळी अभ्यास वर्ग, वेगवेगळे क्लासेस, प्रशिक्षण असले तरी ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे.
अप्रिय घटनांमुळे उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको, याची खबरदारी पालकांनी घेण्याची गरज आहे. मुले खेळत असताना ती कोठे आहेत?, काय खेळ खेळताहेत? याकडे लांबून का होईना पण लक्ष असायलाच हवे. पालकांनी वेळीच लक्ष दिले तर दुर्घटना निश्चितपणे टळल्या जातील. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटणार्या या चिमुरड्यांच्या खेळाचे व्यवस्थापनही तितकेच गरजेचे बनले आहे.
पालकांनी चिमुरड्यांची काळजी घेवून ते कोठे जात आहेत? काय खेळताहेत? याची काळजी घेतली तर निष्पाप जीवांचे प्राण नक्कीच वाचतील. मात्र त्यासाठी चिमुरड्यांच्या खेळण्या-बागडण्यावर मर्यादा घालू नये. उन्हाळी सुट्टीचे बळी वाचवण्यासाठी पालकांबरोबरच सर्वांनीच जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. चिमुरड्यांना खेळण्या-बागडण्याचा आनंद लुटू द्या. उगाच सुरक्षेचा बाऊही करायला नको हेही तितकेच महत्त्वाचे.
पूर्वीच्या कथा अन् गाण्यातील 'मामाचा गाव' आता उरला नसला तरी चिमुरड्यांमध्ये अद्यापही गावाकडची ओढ आहेच. सुट्ट्या लागल्या रे लागल्या की बालगोपाळांना गावाकडचे वेध लागतात. गावी मग मित्र, मैत्रिणी, नात्यातील सहकारी यांची गट्टी जुळली की त्यांच्या खेळण्याला जणू काही आकारच राहत नाही. अगदी देहभान हरपून बालचमू सुट्टीचा आनंद घेत असतात. त्यांचे जेवणाकडेही लक्ष नसते. दिवसभर उन्हातान्हात खेळण्यातच त्यांचा आनंद सामावलेला असतो. पोटात काय असले काय अन् नसले काय, त्या काहीही फरक पडत नाही. भुकेलाही त्यांनी जणूकाही सुट्टीच दिलेली असते.
पूर्वीचे खेळ आता हरवून गेले असून अनेक खेळतर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चिमुरड्यांच्या 'भांडीकुंडी' खेळाचा बाज मात्र आजही टिकून आहे. ही चिमुरडी मंडळी मिळेल त्या जागेत, कधी कोनाड्यात तर कधी छपरात, कधी काट्याकुट्यात तर कधी अगदी घरातील एकाद्या मोडक्या टेबलखालीही भांडीकुंडीचा संसार थाटत असतात. कोण भरउन्हात पोहायला जातो तर कोण सावलीत पत्त्याचा डाव मांडत असतो. अनेकजण कॅरमसारखे बैठे खेळही खेळत उन्हाची तिरीप घालवतात. उन्ह खाली झाले की क्रिकेटच्या मैदानावर बालगोपाळांची जणूकाही जत्राच भरत असते.