Latest

शोध सुखाचा : निवड आणि सामर्थ्य

Arun Patil

तुम्हाला हवे ते कसे मिळवता येते, त्यासाठी तुमचा विश्वास आणि सुप्त मन इतक्याच दोन गोष्टी पुरेशा आहेत. हे आतापर्यंत तुम्हाला नक्की समजले आहे.

विश्वास किंवा श्रद्धा हे सगळ्या यश आणि अपयशाचे कारण आहे. योग्य पद्धतीचा विश्वास यश देतो, तर अविश्वास अपयशाला कारण ठरतो. विश्वास बसण्यासाठी अनुभव लागतो किंवा आपल्यासमोर तसे उदाहरण लागते. म्हणजे एखाद्या डॉक्टरांचा गुण आला की, तो माणूस दुसर्‍याला सांगतो आमक्या डॉक्टरांकडे जा, त्यांचा हातगुणच जबरदस्त आहे. लगेच गुण येतो. ही एकप्रकारची श्रद्धा असते. दुसर्‍या व्यक्तीनं त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून त्या डॉक्टरांचे औषध घेतले, तर निम्म्याहून अधिक काम विश्वासानेच होते. उरलेले काम औषधे करतातच. असेच अनेक बाबतीत घडत असते. हा विश्वास म्हणजेच सुप्त मनाचे कार्य. मग, हा विश्वास मिळवायचा कसा?कारण, कुणाला कुठली गोष्ट कधी पटेल आणि कधी पटणार नाही, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या स्वत:च्या धारणा आणि समजुतींवर अवलंबून असते. या सुप्त मनाला योग्य पद्धतीने कसे कामाला लावायचे, याच्या काही पद्धती आहेत.

पहिली पद्धत म्हणजे स्वयंसूचना. म्हणजे स्वत:ला दिलेल्या योग्य सूचना. या सूचना म्हणजे निव्वळ मनात आणलेले, आलेले विचार नव्हेत, तर मनाच्या विशिष्ट अवस्थेत जाऊन मनाला दिलेले योग्य आदेश असतात.

याकरिता सर्वप्रथम जेव्हा तुम्हाला अगदी शांत असे बसता येईल ते ठिकाण आणि वेळ निवडा. आजूबाजूला गोंधळ, कोलाहल नसावा. मनातल्या विचारांना स्वल्पविराम देत काही मिनिटे संथ श्वासोच्छ्वास करा. आपले मन थोडे स्थिर झाले की, आपल्याला नेमके काय हवे आहे, त्याबद्दल अगदी स्पष्ट शब्दांत सूचना द्यायला सुरू करा. हे मनातल्या मनात किंवा तोंडाने हळू पण स्वच्छ ऐकू येईल अशा शब्दांत काही वाक्ये उच्चारायला सुरुवात करा. समजा, तुमच्या मनात स्वत:च्या नोकरीबाबत, पैशांबाबत काही समस्या असतील, तर त्या सुटल्या आहेत, असे समजून केलेली वाक्य रचना असावी. सुटसुटीत आणि छोटी वाक्ये असावीत. ठाम विश्वासाने ही वाक्ये पुन: पुन्हा उच्चारावीत. असे शक्य असेल तेव्हा करावे. विशेषत: रात्री झोपेच्या आधी घेतलेल्या स्वयंसूचनांचा पुष्कळ लाभ होतो, असे अनेकांना दिसून आलेले आहे. स्वयंसूचना या अमूकच शब्दात, अमूकच वेळ कराव्यात असे काही नाही. दिवसभरात असंख्य विचार उगीचच मनात येरझार्‍या घालत असतात. काही विचार तर निरुपयोगीच असतात; पण मनाला चाळाच असा असतो की, ते विचारहीन असे राहू शकत नाही. त्याला सतत विचारांचे खाद्य हवे असते. जाणीवपूर्वक चांगले विचार पेरत राहिलो, तर किमान वाईट आणि निरुपयोगी विचारांची संख्या तरी कमी होईल. शक्य तेव्हा आठवणीने असे विचार, सूचना करत राहणे ही उत्तम सवय लावूनच घ्यायला लागते.

दुसरी पद्धत आहे ती व्हिज्युलायझेशन म्हणजे मनोमन चित्रफीत पाहणे. आपल्याला आपले आयुष्य किंवा एखादी गोष्ट कशी हवी आहे, याबाबत चित्र, प्रतिमा पाहणे. आपल्या स्मरणात एखादी गोष्ट राहते असे आपण म्हणतो, तेव्हा ती आठवण चित्र किंवा प्रतिमा या रूपातच लक्षात ठेवलेली असते. म्हणजे मेंदू चित्रांच्या सहाय्यानेच काहीही स्मरणसाठ्यात ठेवत असतो. त्यामुळे एखादी चांगली गोष्ट घडून यावी, असे वाटत असेल, तर तशी चित्रमालिका मनाने साकारून, शांत, स्वस्थ मनःस्थितीत ती वारंवार पाहायची. एक साधे उदाहरण घेऊया! समजा, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे आहे, तर तुम्ही बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या मनाने कोणत्या रस्त्याने जायचे, कुठे वळायचे, कोणते शॉर्टकट आहेत, हे मनाने विचार करूनच ठेवलेले असते. वाटेत काही घ्यायचे असेल, तर कोणत्या दुकानात जायचे, याचेही चित्र तुमच्या मनाने काही सेकंदांत पाहिलेले असते. म्हणूनच आपण त्या मार्गाने जातो. अशाच पद्धतीने कोणतीही मोठी गोष्ट मिळविण्यासाठी हवी ती मानसप्रतिमांची मालिका तयार करा. त्या प्रतिमा अगदी छोट्या छोट्या डिटेल्सनी युक्त असाव्यात.

एका पॅरलाईज्ड पेशंटने अशा पद्धतीने स्वत:ला बरे केल्याचे उदाहरण 'जोसेफ मर्फी' यांच्या पुस्तकात वाचले. तो मनुष्य अशी प्रतिमा पाहत असे की, 'तो उठून स्वत:च्या पायांनी चालत, वाटेत हळूहळू धरत पुढे जात आहे. त्याचे डॉक्टर त्याला पाहून आनंदाने शेकहॅन्ड करत आहेत.' या चित्रात सगळे तपशील तो बारकाईने पाहत असे. त्यामुळे हे चित्र त्याच्या सुप्त मनाने आहे तसे स्वीकारले आणि तो पूर्णपणे बरा झाला.

अर्थात, हे सगळे स्वस्थ, शांत मनाने पूर्ण विश्वासाने आणि सातत्याने करायला हवे, तरच उत्तम परिणाम दिसून येतील. 'विश्वास' कसा ठेवायचा हा एक प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतोच. कारण, अनुभव आल्याशिवाय विश्वास बसत नाही. त्यामुळे तो ठेवण्यासाठी आधी मनातला सगळा कचरा साफ करावा लागतो. कचरा म्हणजे काय, तर वाचून ऐकून, बघून आपल्या मनात रुजलेल्या चुकीच्या धारणा त्या एकाचवेळी सोडून देणं, कठीण असतं. म्हणून सुखाकडे जाण्याच्या या मार्गावर एक एक पाऊल पुढे जायचं; पण नेटाने न कंटाळता जायचं.

तुमच्या 'सुखा'ची आधी व्याख्या ठरवा. प्रत्येकाचे सुख वेगवेगळ्या गोष्टीत असते. कुणाला भरपूर पैसा, ऐषोआराम म्हणजे सुख वाटेल, तर कुणाला उत्तम करिअर, मान, सन्मान म्हणजे सुख वाटेल, तर कुणाला उत्तम आरोग्य म्हणजे सुख वाटेल. तुम्हाला नेमके काय काय हवे आहे, त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. ते सगळेच्या सगळे कागदावर लिहून काढा. नुसते मनात ठेवले, तर ते विसरून जाईल. समजा, तुमचा क्रम 1) सुंदर घर 2) उत्तम सेव्हिंग्ज 3) सुद़ृढ शरीर 4) मुला-मुलींची लग्ने, व्यवसाय असे काहीही असू शकेल.

या प्रत्येक गोष्टीबद्दल तुमची आताची मते काय आहेत, हे अभ्यासा. म्हणजे, तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल, तर त्याबद्दल तुम्ही काय काय विचार करता, त्यात नकारात्मक विचार किती आहेत, किती वेळा तुम्ही वाईट गोष्टींचा, कोणत्या शब्दांत विचार करता, ते पाहा. नीट पाहा. कारण, तुम्हाला तुमच्या विचारांवरच काम करायचे आहे. कोणतेही पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे गरजेचे असते. तसेच हे. सर्वात पहिल्या प्राधान्यक्रमाकडे पाहताना आधीचे सगळे नकारात्मक विचार कागदावर लिहा. नंतर ते फुली मारून खोडा आणि त्याऐवजी तिथे सकारात्मक विचार लिहा ते पुन: पुन्हा वाचत राहा. यापुढे आयुष्यात येणारे चांगले बदल हे शांती, सुसंवाद, सदिच्छा घेऊन येणार आहेत, असाच सतत विचार करत राहा. याचबरोबर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असताना ती गोष्ट अस्तित्वात आहे, याची खात्री बाळगा आणि त्याचे चित्र मनात तयार करा. एक चित्र हजार शब्दांचे काम करते. मनातल्या मनात आपल्याला हवे ते अस्तित्वात आहे व ते तुम्हालाच मिळणार आहे, अशा स्थितीपर्यंत मनाला नेणे, इतकेच तुमचे काम. उरलेले काम तुमचे सुप्त मन करते, याची खात्री बाळगा.

हवे ते सुख मिळवण्यापूर्वी आणखी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता बाळगण्यासाठी नेमकी पद्धत समजावून घ्यायला हवी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT