कानपूर; वृत्तसंस्था : शत्रूचा मुकाबला करताना लढवय्या जवानांची प्राणहानी कमी व्हावी व अतिवेगवान हल्ला करता यावा यासाठी आयआयटी कानपूरने सुसाईड ड्रोन विकसित केले असून डीआरडीओ आणि लष्करासोबत चाचण्या घेऊन त्यांच्या उत्पादनावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कानपूर आयआयटी आणि डीआरडीओ यांनी संयुक्तपणे हा संशोधन प्रकल्प राबवला असून त्यातूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने घातक मारक क्षमता असणारे हे ड्रोन विकसित करण्यात आले आहे. खास भारतीय लष्कराला डोळ्यासमोर ठेवून ते विकसित करण्यात आले आहे. एआयच्या मदतीने लक्ष्याचा माग काढत हे ड्रोन सहा किलो वजनाची स्फोटके व बॉम्ब घेऊन शत्रूच्या ठिकाणावर आदळू शकते. या ड्रोनचा पल्ला 100 कि.मी.चा असून हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत ते कापू शकते. दोन मीटर लांबीचे हे ड्रोन रॉकेट लाँचरसारख्या साधनाच्या मदतीने कुठूनही सोडता येऊ शकते.
कोणत्याही शक्तिशाली रडारपासून लपण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान म्हणजे स्टिल्थ तंत्रज्ञान या ड्रोनसाठी वापरण्यात आले असून त्यामुळे शत्रूला ते धडकेपर्यंत त्याचा मागमूसही लागणार नाही. आयआयटीच्या एअरोस्पेस विभागाचे असिस्टंट प्रोफेसर सुब्रमण्यम सद्राला यांनी सांगितले की, लक्ष्यभेदाच्या चाचण्या लवकरच घेण्यात येणार असून सहा महिन्यांत या चाचण्यांच्या निष्कर्षानंतर हे सुसाईड ड्रोन भारतीय लष्करासाठी विकसित केले जाणार आहेत.
या सुसाईड ड्रोनमुळे शत्रूच्या भूभागात थेट घातक व मारक कारवाई करण्याची क्षमता भारतीय लष्कराला प्राप्त होणार आहे. त्यामुळे थेट चकमकींमुळे होणारी भारतीय लष्कराची प्राणहानी टळू शकते.
लांबी : दोन मीटर
आकार : फोल्डेबल
स्फोटक क्षमता : सहा किलो
पल्ला : 100 कि.मी.