Latest

Sudhakar Badgujar : राजकीय सुडाने माझ्यावर गुन्हे, चौकशीला सामोरे जाण्यास तयार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सन २०१६ मध्ये जेव्हा विजया रहाटकर यांची वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा झाली होती. या सभेच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले असता, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये सत्यभामा गाडेकर, दीपक दातीर, पवार, मटाले यांच्यासह मलाही अटक झाली होती. त्यावेळी १४ ते १५ दिवस कारागृहात होतो. त्याठिकाणी १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे कैदीही होते. पण त्याविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती+. कारागृहाबाहेर आल्यानंतर बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी सार्वजनिक कार्यक्रमात कुठे भेट झाली असेल तर माहिती नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मॉर्फिंगही केले असेल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता याच्यासोबतच्या संबंधाचे आरोप फेटाळून लावले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे व पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केला. तसेच याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओदेखील प्रसारित केले. यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. यावर पत्रकार परिषदेत घेत बडगुजर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

बडगुजर म्हणाले, 'पालकमंत्र्यांनी सभागृहात जे आरोप केले, त्याबाबत त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. राजकारणात येण्यापासून माझ्यावर एनसीदेखील दाखल नव्हती. जे गुन्हे दाखल झाले ते राजकीय हेतूने दाखल झालेले आहेत. १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली असेल, तर मला माहिती नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तो पॅरोलवर कारागृहाबाहेर होता. मुळात पॅरोलवर आलेला कैदी सार्वजनिक जीवनात वावरू शकतो काय? त्यामुळे सलीम कुत्ता याच्याशी जोडला जाणारा माझा संबंध चुकीचा आहे. त्याच्याशी माझे संबंध नव्हते अन् नसतील. मी जेव्हा १४ दिवस कारागृहात होतो, तेव्हा तोदेखील त्याठिकाणी होता. याव्यतिरिक्त आमच्यात काहीही संबंध नाहीत.

दरम्यान, अद्याप पोलिसांकडून मला संपर्क साधला गेला नाही. यासंबंधीच्या चौकशीला माझे संपूर्ण सहकार्य असेल. राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप केले जातात. खचून न जाता मी संपूर्ण चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही बडगुजर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, महेश बडवे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

अंधारे, राऊत बाजू मांडणार

या प्रकरणी बडगुजर यांनी विस्तृतपणे न बोलता वरिष्ठांशी माझी चर्चा झाली असून, पक्षाचे नेते संजय राऊत, सुषमा अंधारे हे सविस्तर बाजू मांडणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील बोलणे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पटेल-इकबाल मिर्ची यांचे जाॅइंट व्हेंचर

नाशिकमध्ये जेव्हा दाऊद यांच्या नातेवाइकांचे लग्न झाले होते तेव्हा मंत्री, आमदार, खासदार तसेच पोलिस अधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल व इकबाल मिर्ची यांचे तर जाॅइंट व्हेंचर आहे. मग याचीही चौकशी व्हायला हवी, असेही बडगुजर म्हणाले.

पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे

एमडी ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यांच्याविरोधात काढलेला मोर्चा, सभा हे सारे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे ते निराधार आरोप करीत आहेत. माझ्या संपत्तीवर बोलण्यापेक्षा भुसे यांना जलसंपदा विभागातून का निलंबित केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असेही बडगुजर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT