पिंपळगाव बसवंत : दावचवाडी येथील आपल्या द्राक्षबागेत काम करताना पांडुरंग व सविता धुमाळ दाम्पत्य.  (छाया : सुरेश पगारे) 
Latest

Success Story | दोन्ही डोळ्यांनी अंध, लग्न होणार की नाही प्रश्न… तरीही त्याने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुटुंबाचा भार सोसत फुलवली द्राक्षबाग 

अंजली राऊत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्याही संकटावर मात करता येते, याची प्रचिती निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील अंध दाम्पत्याने फुलविलेल्या शेतीकडे पाहिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. दोन्ही डोळ्यांची पूर्ण अंध असलेल्या या दाम्पत्याची शेती म्हणजे केवळ शेतकऱ्यांसमोरच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणादीयी ठरत आहे.

दावचवाडी येथील पालखेड रस्त्यावर पांडुरंग यशवंत धुमाळ (33) यांना 2001 मध्ये अपघातात दोन्ही डोळे निकामी होऊन पूर्ण अंधत्व आले. त्यामुळे शेतकरी असलेले पांडुरंग यांच्या यापुढे शेतीचे काम कसे करावे तसेच लग्न होणार की, नाही याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु योगायोगाने 2017 मध्ये त्यांचा विवाहदेखील अंधत्व आलेल्या सविता हिच्याशी झाला. डोळ्यांनी अंध असले या दोघांच्याही मनात मात्र, दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने या दोघांनी हार न मानता दोन एकर द्राक्षबाग, कांदा आणि टोमॅटोची शेती करीत आपल्या कष्टातून फुलांचा मळा फुलविला आहे. त्यासाठी त्यांना पांडुरंग यांची आई सिंधूबाई धुमाळ या मार्गदर्शन करीत असतात.
पांडुरंग सविता दाम्पत्याला आता पाच वर्षांचा मुलगाही आहे.

कष्टाळूपणात सविताचा खांद्याला खांदा
पांडुरंग व सविता यांची स्वतःच्या साडेतीन बिघे शेती असून, त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याची दोन एकर शेती बटाईने केली आहे. अंध असतानाही ते द्राक्षबाग व कांद्याला फवारणी करणे, पिकांना पाणी भरणे, जनावरांना चारा टाकणे ही सर्व कामे करीत असतात. तर पत्नी सविता शेती कामासोबतच घरातील स्वयंपाक व इतर सर्व कामे नित्यनियमाने करतात.

2021 मध्ये अंधत्व आले. अनेक उपचार घेऊनही दृष्टी परत आली नाही. त्यामुळे खचून न जाता शेती व्यवसायाकडे लक्ष दिले. आईच्या मदतीने शेती करायला लागलो. २०१७ मध्ये लग्न झाले. पाच वर्षांचा मुलगाही आहे. आम्ही दोघे मिळून शेती कराते. अंधत्व आले म्हणून खचून गेलो नाहीत. – पांडुरंग धुमाळ, दावचवाडी (ता. निफाड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT