गोरखपूर ः सध्या हरेक नमुन्यांच्या राख्या पाहायला मिळत असतात आणि हौशी भगिनीवर्गाकडून आपल्या भाऊरायासाठी अशा 'हट के' राख्याही निवडल्या जात असतात. केवळ भाऊच बहिणीचे रक्षण करण्यासाठी पुढे येतो असे नाही तर बहिणीही भावाचे रक्षण करण्यासाठी पुढे येत असतात. गोरखपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आता एक अनोखी राखी तयार केली आहे. ही राखी भावाच्या मनगटाची शोभा वाढवण्याबरोबरच त्याचे रक्षणही करील. ही 'डिजिटल मेडिकल सेफ्टी'ची राखी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
गोरखपूरमधील कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूजा यादव आणि फार्मसी विभागातील राणी ओझा या दोघींनी मिळून ही स्मार्ट डिव्हाईस राखी तयार केली आहे. या राखीवर एक बटण दिलेले आहे जे दाबताच संकटाच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या कुटुंबाला मेसेज किंवा कॉल करून तुम्ही संकटात असल्याची माहिती दिली जाईल. इतकेच नव्हे तर अपघात झाल्यास सर्वात आधी तुमच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन तुमच्यासाठी रक्ताची व आवश्यक औषधांच्या उपलब्धतेची माहिती गोळा करण्याचे कामही ही राखी करते. ही राखी तयार करणार्या पूजा व राणी यांनी या राखीला 'मेडिकल सेफ्टी राखी' असे नाव दिले आहे. सहसा बाईक किंवा कार चालवताना अपघात झाल्यास कुटुंबीयांना फार उशिरा समजते. जर अशावेळी त्वरित मदत मिळाली तर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यात मदत होऊ शकते. याच समस्येवर उपाय शोधताना या विद्यार्थिनींनी ही राखी बनवली आहे. गाडी चालवताना आपण ब्लुटूथ वापरून राखी मोबाईलला जोडू शकता. या राखीमध्ये आपण डॉक्टर, रुग्णवाहिका व कुटुंबीयांचे मोबाईल नंबर जोडू शकता. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत राखीवर डबल टॅप केल्यावर तुम्ही सेट केलेल्या क्रमांकाला अपडेट केले जाईल.