पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीची नवीन पहिली लालपरी बस सोमवारी (दि. 26) पुणे विभागात दाखल झाली. ही बस पुणे ते वाशीमदरम्यान प्रवासी सेवा पुरविणार आहे. या बसचे तिकीट दर साध्या बसच्या दराप्रमाणेच असणार आहेत. 'गड्या आपली लालपरीच बरी म्हणत' बहुतांश प्रवासी या एसटीच्या साध्या लाल गाडीनेच प्रवास करण्यावर भर देत असतात. मात्र, एसटीच्या ताफ्यातील या बहुतांश लाल गाड्यांचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. आणि या गाड्या सातत्याने बंद पडत होत्या.
त्यामुळे एसटी प्रशासनाने नव्या लालपरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नव्या लालपरी गाड्या राज्यभरातील एसटीच्या विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या डेपोंमध्ये समाविष्ट होत आहेत. एसटीच्या पुणे विभागासाठी तब्बल 80 नव्या कोर्या लालपरी दाखल होणार आहेत. यातीलच पहिली गाडी सोमवारी पुणे विभागात दाखल झाली. ही गाडी पुणे विभागातील मुख्यालयात आणण्यात आली असून, तिचे पहिले चालक सुमित शेंडे आहेत तर वाहक प्रशांत मोहबे हे आहेत.
नव्या लालपरीत आहेत या सुविधा…
200 जुन्या गाड्या भंगारात काढल्या
एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात सध्या 448 लालपरी बस आहेत. तर प्रशासनाने आयुर्मान संपल्यामुळे नुकत्याच 200 बस ताफ्यातून स्क्रॅप केल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाला नव्या बसची गरज आहे. त्यामुळे या नव्या 'लालपरी' 80 बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया मंजूर झाली आहे. या गाड्या भाडेतत्त्वावरील असणार आहेत. यासोबतच यापूर्वी एसटीच्या पुणे विभागात नव्या 2 ई-बस दाखल झाल्या आहेत. आणि आणखी नव्या ईलेक्ट्रिक बसदेखील येणार आहेत. त्यामुळे लालपरी बससह एसटीचा पुणे विभाग आता कात टाकणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशा 80 नव्या लालपरी बस पुणे विभागात दाखल होणार आहेत. त्याचे टेंडर मंजूर झाले असून, जानेवारी अखेरपर्यंत या सर्व गाड्या पुणे विभागात दाखल होतील. या बसचे तिकिटाचे दर साध्या बसप्रमाणेच असणार आहेत.
– ज्ञानेश्वर रणावरे,
विभागीय वाहतूक व्यवस्थापक, एसटी, पुणे विभाग