Stomach Cancer 
Latest

‘माऊथवॉश’ लावणार पोटातील कर्करोगाचा छडा

Arun Patil

वॉशिंग्टन : पोटाचा कर्करोग (Stomach Cancer) हा जगभरात कर्करोगाने होणार्‍या मृत्यूंमागील चौथे प्रमुख कारण आहे. त्याचे निदान बहुतांशी उशिराच होत असते व त्यामुळे आजार बळावल्याने उपचार करणे कठीण होऊन बसते. मात्र, आता आशेचा एक नवा किरण दिसू लागला आहे. अलीकडेच झालेल्या एका संशोधनात संशोधकांना आढळले, की तोंड स्वच्छ करणार्‍या सामान्य अशा पाण्याने म्हणजेच ओरल रिंसने पोटाच्या कर्करोगाचा लवकर छडा लावता येऊ शकतो. एका अर्थी माऊथवॉशच्या सहाय्याने पोटातील कर्करोगाचे निदान करता येऊ शकेल.

या संशोधनाची माहिती आता अमेरिकेतील डायजेस्टिव्ह डिसीज वीक संमेलनात दिली जाणार आहे. संशोधकांनी या शोधासाठी 98 लोकांच्या तोंडातील बॅक्टेरियाचे म्हणजेच जीवाणूंचे नमुने गोळा केले व त्यांचे विश्लेषण केले. त्यापैकी 30 लोकांना पोटाचा कर्करोग (Stomach Cancer) होता. तीसजण प्री-कॅन्सर स्टेजमध्ये होते आणि 38 लोक निरोगी होते. संशोधनात आढळले की पोटाचा कॅन्सर आणि प्री-कॅन्सरने ग्रस्त लोकांच्या तोंडातील बॅक्टेरिया तसेच निरोगी लोकांच्या तोंडातील बॅक्टेरियांमध्ये स्पष्ट असा फरक होता. इतकेच नव्हे तर कॅन्सर आणि प्री-कॅन्सर बाबतीतही बॅक्टेरियांमध्ये अतिशय कमी फरक होता.

त्यामधून हा संकेत मिळतो की पोटात बदल सुरू झाले की तोंडातील बॅक्टेरियांमध्येही परिवर्तन होऊ लागते. प्रमुख संशोधक डॉ. पेराटी यांनी सांगितले, की तोंड आणि पोटातील बॅक्टेरिया एकमेकांशी निगडित आहेत. तोंडातील बॅक्टेरिया आपल्याला पोटातील स्थितीचा अंदाज देऊ शकतात. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा छडा लवकर लागू शकतो. हे संशोधन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून, त्यावर आता आणखी सखोल संशोधन केले जाणार आहे. मात्र, हा एक महत्त्वाचा शोध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर भविष्यात तोंड धुण्याच्या पाण्यानेच पोटाच्या कर्करोगाचा छडा लावता आला, तर या कर्करोगाचे निदान लवकर होऊन उपचारातही क्रांतिकारक बदल घडू शकतात. त्यामुळे भविष्यात अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT