Latest

Stock Market Updates | सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला, पण अदानींच्या शेअर्सची दाणादाण

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Updates : जागतिक मध्यवर्ती बँकांनी महागाई कमी होण्याचे संकेत दिल्याने व्याजदरवाढीचे सत्र थांबेल या आशेने अमेरिकेसह आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. तसेच फायनान्सिल स्टॉक्समधील वाढीमुळे आज शुक्रवारी (दि.३) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली होती. सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून आज खुला झाला होता. तर निफ्टी १७,७०० वर खुला झाला होता. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सेन्सेक्स ९३३ अंकांनी वाढला. तर निफ्टीने १७,८०० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ९०९ अंकांनी वाढून ६०,८४१ वर बंद झाला. तर निफ्टी २४३ अंकांनी वाढून १७,८५४ वर बंद झाला.

आजच्या व्यवहारातही अदानी शेअर्संमधील (Adani stocks) घसरण कायम राहिली. अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अदानींचे १० शेअर्समध्ये घसरण कायम असून त्यांच्या बाजार भांडवलात निम्म्याने घट झाली आहे. यामुळे अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे ७ दिवसांत १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अदानींचे बाजार भांडवल ५१ टक्क्यांहून अधिक झाले कमी

हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून गेल्या सात ट्रेडिंग सत्रांत अदानी समूहाच्या सर्व १० शेअर्सचे बाजार भांडवल (market capitalisation) ५१ टक्क्यांपेक्षा कमी होऊन ९.३१ लाख कोटी रुपयांवर आले आहे. शेअर बाजारातील आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises) शेअर सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत घसरला. हा शेअर १,०९५ रुपयांवर आला. दुपारनंतर या शेअरची घसरण थांबल्याचे दिसून आले. ५२ आठवड्याच्या उच्चांकावरून हा शेअर सुमारे ७४ टक्क्यांनी खाली आला आहे. याआधी अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेसचा २० हजार कोटी रुपयांचा FPO मागे घेतला होता.

अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स १० टक्क्यांनी खाली आले आहेत. अदानी पोर्टस्, अदानी विल्मर हे ५ टक्क्यांनी घसरले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर फसवणुकीचे आरोप केल्यानंतर बँकांनी अदानी यांच्या वित्त स्थितीची छाननी सुरू केली आहे. यातून सावध होत, सिटी ग्रुपच्या संपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांचे रोखे स्वीकारणे बंद केले आहे.

आजच्या व्यवहारात मेटल स्टॉक्सनाही फटका बसला. हिंदुस्थान कॉपर (७.७६ टक्के घट), नॅशनल अॅल्युमिनियम (३.६९ टक्के घट), हिंदाल्को (२.६३ टक्के घट), स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (३.४८ टक्के घट), टाटा स्टील (१.५८ टक्के घट) हे शेअर्स घसरले. बहुतांश रियल्टी स्टॉकही आज घसरले होते. (Stock Market Updates)

टायटनचा शेअर ५.५४ टक्क्यांनी वाढला

टायटन कंपनीचा शेअर आज ५.५४ टक्क्यांनी वाढून २,४३६ रुपयांवर पोहोचला. टायटनसह इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह हे आजच्या व्यवहारातील टॉप गेनर्स होते. तर पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, एचसीएल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर

उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी निव्वळ ३०६५.३५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) निव्वळ २३७१.३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. २ फेब्रुवारीपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण १,२८० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,९०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT