Latest

Stock Market Today | वाढत्या महागाईचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स, निफ्टी घसरला

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Today : कमकुवत जागतिक संकेत तसेच किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून आल्यानंतर त्याचे पडसाद आज गुरुवारी (दि.१३) शेअर बाजारात दिसून आले. गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे २०० हून अंकांनी घसरून ५७,४०० वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही घसरुन १७, १०० च्या खाली व्यवहार करत आहे. अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने महागाई सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. काल बुधवारी शेअर बाजारात तेजी होती. पण आज बाजारात घसरण दिसून येत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचा दर ०.१ टक्क्याने घसरून प्रति बॅरेल ९२.३८ डॉलरवर आला आहे.

आशियाई बाजारात घसरण…

वॉल स्ट्रीटच्या पाठोपाठ आशियाई बाजारात घसरण कायम आहे. जागतिक मंदीची जोखीम वाढत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. याचे पडसाद बाजारात दिसून येत आहेत. गुरुवारी सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ५२ पॉइंट्स म्हणजे ०.३० टक्क्यांनी घसरून १७,०५३ वर व्यवहार करत होता. येथील शेअर बाजारात गुरुवारी नकारात्मक वातावरण असल्याचे दिसून आले. टोकियो स्टॉक एक्सचेंजचा निक्केई २२५ निर्देशांक ०.०४ टक्के म्हणजेच १०.३९ अंकांनी घसरून २६,३८६.४४ वर आला होता. तर टॉपिक्स निर्देशांक ०.२१ टक्के म्हणजे ३.९५ अंकांनी घसरून १,८६५ वर आला होता.

सलग तीन सत्रातील घसरणीनंतर काल बुधवारी (दि.१२) शेअर बाजार सावरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती घसरल्याने शेअर बाजारात काल सकारात्मक वातावरण तयार झाले होते. यामुळे बीएसई सेन्सेक्स ४७८ अंकांनी वधारुन ५७,६२५ वर बंद झाला. तर निफ्टी १४० अंकांनी वर जात १७,१२३ वर बंद झाला होता. सेन्सेक्स, निफ्टी तेजीत आल्याने आयटी, ऑटो समभाग वधारले.

काल बुधवारी कोल इंडियाचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले. या शेअर्सनी ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती. हे शेअर्स दुपारच्या व्यवहारांमध्ये २.५ टक्क्यांहून अधिक वाढले. तर Indian Oil Corp, बीपीसीएल, ऑइल इंडिया, एचपीसीएल आणि इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स केंद्रीय मंत्रिमंडळ तेल विपणन कंपन्यांसाठी सबसिडी मंजूर करेल या आशेवर ‍वधारल्याचे दिसून आले होते. दरम्यान, मजबूत डॉलरमुळे बुधवारी रुपया १२ पैशांनी घसरून ८२.३३ वर बंद झाला होता. (Stock Market Today)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT