Latest

शेअर बाजारात तेजीच्या धारा!

Arun Patil

निफ्टी – 18500
बँक निफ्टी – 44000

निफ्टीने शुक्रवार दिनांक 26 मेच्या सत्रामध्ये 18500 (18499.35) आणि बँक निफ्टीने 4400(44018) चा टप्पा पार केला. हा बाजाराच्या द़ृष्टीने अलीकडच्या काळातील अभूतपूर्व आनंदाचा क्षण मानावा लागेल. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे निफ्टी लार्ज कॅप, निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप हे प्रमुख निर्देशांक तर वाढलेच; शिवाय आय.टी., एनर्जी, फार्मा, इन्फ्रा, रियल्ट्री, एफएमसीजी, ऑटो, मेटल असे सर्वच्या सर्व सेक्टरला निर्देशांकही वाढले. जगातील शेअर बाजार US Debt Ceiling किंवा Debt Limit च्या छायेत असताना भारतीय बाजार या आठवड्यात वाढले,

हे विशेष!

आज जगातील सर्व शेअर बाजारांना आणि गुंतवणूकदारांना हा जो US Debt Ceiling चा प्रश्न भेडसावतो आहे, तो नक्की काय आहे? अमेरिकन सरकारला अमेरिकेच्या अर्थ व्यवस्थेचा गाडा हाकण्यासाठी म्हणजे सुव्यवस्था, संरक्षण, विविध पेमेंट्स, कर्मचार्‍यांचे वेतन आदी सर्व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी जो पैसा लागतो, तो अमेरिकेचे सरकार कर्जे काढून उभारते. ही कर्जे विविध बाँडस्च्या माध्यमातून असतात. आणि बाँडधारकांना नियमितपणे व्याजही द्यावे लागते. परंतु अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे या कर्ज उभारणीचे अंतिम प्रमाण किंवा मर्यादा ही ठरलेली आहे, यालाच Debt Ceiling किंवा Debt Limit म्हणतात. आज घडीला हा Ceiling चा आकडा किती आहे? तर तो आहे 31.4 ट्रिलीयन डॉलर्स! (1 ट्रिलीयन म्हणजे 1 लाख कोटी) हा आकडा जानेवारीमध्येच गाठला गेला आहे आणि तूर्त हा सर्व दैनंदिन खर्च ट्रेझरी डिपार्टमेंटकडून काही Extraordinary Measures असामान्य उपाय शोधून चालविला जात आहे. परंतु ट्रेझरी सेक्रेटरी जानेट येलेन यांनी इशारा दिला आहे की, या उपायांची मर्यादा 1 जून रोजी समाप्त होईल. आणि त्यापूर्वी हा प्रश्न सोडविला नाही, तर भयंकर पेचप्रसंग निर्माण होईल.

या आठवड्यामध्ये निफ्टी मेटल (5.96%), निफ्टी आय.टी (5.25%) या सेक्टरर्सनी बाजार उंचावण्यास मोठी मदत केली. अदानी एंटरप्राईज (34.62% साप्ताहिक वाढ) इंडिया बुल्स रिअल इस्टेट (23.60%), डिक्सन टेक्नॉलॉजीज् या आठवड्यात 30% कोसळला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मेडिप्लस हेल्थ सर्व्हिसेसचा शेअर 20 टक्क्यांनी वाढून Upper Circuit चा मानकरी ठरला. कारण होते Q4 2023 मधील अत्युत्तम आर्थिक निकाल! कंपनीचा निव्वळ नफा 126.60 टक्क्यांनी वाढून 26.58 कोटी रु. झाला, तर निव्वळ उत्पन्नही 30 टक्क्यांनी वाढले. ही कंपनी औषधांची किरकोळ विक्री स्टोअर्सच्या माध्यमातून आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करते.
चालू वर्षाच्या मे महिन्यात परदेशी वित्त संस्थांची शेअर्स खरेदी सुरू राहिली. एकूण 37.317/- कोटी रुपयांची त्यांनी खरेदी केली. भरीस भर म्हणून देशी वित्तसंस्थांनीही सलग पाचही दिवस खरेदीत रस दाखविला आणि एकूण 34.82.20 कोटी रुपयांची खरेदी केली. परदेशी वित्तसंस्थांनी गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या खरेदीचा हा उच्चांक आहे.

ही परदेशी वित्तसंस्थांची FII खरेदी अनेक द़ृष्टींनी महत्त्वपूर्ण असते. हेच फंडस्, म्युच्युअल फंडस्, इन्श्युरन्स कंपनीज्, इन्व्हेस्टमेट बँक्स अशा संस्था या FII सदरात मोडतात आणि त्यांचा आकारही प्रचंड मोठा असतो. या संस्था आपल्या पदरी गुंतवणूक तज्ज्ञांची मोठी फौज बाळगून असतात आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कित्येक महिने त्यांचा अभ्यास सुरू असतो. त्यांची खरेदी म्हणजे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास असतो. ते ज्या शेअर्सची खरेदी करतात, त्या शेअर्सवर Fundamentally Strong दर्जाचा शिक्का बसतो. आणखी एक फायदा म्हणजे ते ज्या देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्या देशाच्या चलनाचीही मागणी आणि परिणामत: चलनाचे मूल्यही वाढते.

असाच एक शेअर आहे. ज्यामध्ये FII, FPI, DII यांनी डिसेंबर 22 ते मार्च 23 या तिमाहीमध्ये तुफानी खरेदी केलेली आहे. इक्विटास स्मॉल फाइनान्स बँक हा तो शेअर! या बँकेच्या शेअर्समध्ये FII, FPI यांचे डिसेेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये होल्डिंग होते 4.08 टक्के, ते मार्च 2023 मध्ये झाले 37.93 टक्के आणि म्युच्युअल फंडस्चे होल्डिंग 13.37 वरून 27.6 टक्के झाले. भारतातील एकूण 12 स्मॉल फायनान्स बँकांपैकी एकूण कर्जे विस्तार आणि बाजार हिस्सा या निकषांवर इक्विटास बँक एयू बँकेच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास, निव्वळ व्याज उत्पन्न 24.3 टक्क्यांनी एकून उत्पन्न 24 टक्क्यांनी, तर निव्वळ नफा 28.5 टक्क्यांनी वाढलेला आहे. श्री. पी. एन. वासुदेवन हे बँकेचे CO आणि MD आहेत. किमान पाच वर्षांसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा असा हा शेअर आहे. शुक्रवार दि. 26 मे 2023 चा त्याचा बंद भाव होता रु. 84.40! बघा, तुम्हाला आवडतो का?

भरत साळोखे,
संचालक, अक्षय प्रॉफीट अँड वेल्थ प्रा.लि. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT