पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Bell : मागील चार सत्रांमध्ये तेजीची घोडदौड कायम ठेवलेल्या भारतीय शेअर बाजारात आज ( दि.13) सुस्ती राहिली. बाजार उघडताच प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करू लागले होते. पण बाजारातील व्यवहार बंद होताना BSE सेन्सेक्सने 79.52 अंकांची वाढ घेत 69,598.45 वर स्थिरावला तर निफ्टीने 32.05 अकांची किरकोळ वाढ नोंदवली आणि तो 20,938.45 वर बंद झाला.
आज शेवटच्या तासात बाजारात खालच्या पातळीवरून मोठी रिकव्हरी झाल्याचे पहायला मिळाले. मिडकॅप निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाला. फार्मा आणि एफएमसीजी शेअर्स तेजीत आहेत. पॉवर स्टॉकमध्येही चांगली वाढ दिसून आली. मिडकॅप निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक तळापासून सुमारे 370 अंकांनी सुधारला आहे. निफ्टीही खालच्या पातळीवरून सुमारे 130 अंकांच्या सुधारणेसह बंद झाला. आज PSE, रियल्टी, फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली. ऑटो, मेटल, एनर्जी, एफएमसीजी निर्देशांकही वाढीने बंद झाले.
पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये सुरू असलेली घसरण बुधवार 13 डिसेंबर रोजीही कायम राहिली. पेटीएमचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सुमारे 3.5% घसरून 592.70 रुपयांवर आले, जे गेल्या 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. यापूर्वी मार्च 2023 मध्ये पेटीएमचे शेअर्स या पातळीवर व्यवहार करताना दिसले होते. डिसेंबरच्या सुरुवातीपासून किंवा गेल्या 8 ट्रेडिंग दिवसांत पेटीएमचे शेअर्स 30 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. यासह, पेटीएमचे शेअर्स आता त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापासून 40.48% दूर आहेत. पेटीएमचा 52 आठवड्यांचा उच्चांक 998.30 रुपये आहे. पोस्टपॉड कर्जाबाबतच्या व्यवसाय धोरणात बदल झाल्यानंतर पेटीएमच्या शेअर्सवर दबाव आहे.
या धोरणात्मक बदलानंतर, अनेक विश्लेषकांनी पेटीएमचे शेअर्स डाउनग्रेड केले आहेत किंवा त्याची लक्ष्य किंमत कमी केली आहे. मोतीलाल ओसवाल यांनी पेटीएम स्टॉकची लक्ष्य किंमत 1,025 रुपये केली आहे.
पेटीएमने आपल्या बैठकीत सांगितले की, लहान आकाराचे पोस्टपेड कर्ज कमी करण्याच्या निर्णयामुळे त्यांचे पोस्टपेड कर्ज निम्म्याने कमी होऊ शकते, परंतु त्याचा मार्जिन किंवा महसूलावर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने यामागे कारण दिले आहे की पोस्टपेडचा टेक रेट सर्वात कमी आहे आणि त्यामुळे महसुलावर कमी परिणाम होईल.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये 2.27 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आज दिवसाअखेर हा शेअर 221 रुपयांवर व्यवहार करत आहे. खरेतर, बँकेने म्हटले आहे की 15 डिसेंबर रोजी बोर्डाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. या घोषणेपासून गुंतवणूकदार या समभागात रस दाखवत आहेत.
डोम्स इंडस्ट्रीजचा 1,200 कोटी रुपयांचा IPO इश्यूच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत 3.4 पटीने सबस्क्राइब झाला. यासाठी 88.37 लाख इश्यू आकाराच्या 3.05 कोटी शेअर्ससाठी बोली आल्या आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्यापेक्षा 13.14 पट अधिक शेअर्स खरेदी केले. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला भाग 3.8 पट भरला गेला आहे.
आयटी, बँकिंग शेअर्सची सर्वाधिक विक्री
बाजारात आज (दि.13) प्रारंभीच्या व्यवहारात सर्वाधिक विक्री आयटी, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांमध्ये दिसून आली. टीसीएस, ओएनजीसी आणि इन्फोसिसचे शेअर्स निफ्टीमध्ये घसरले. तर आयशर मोटर आणि एनटीपीसीच्या शेअर्सनी वाढीसह व्यवहार केला.
याआधी मंगळवारी (दि.12) सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली. अखेर बाजारातील व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 394.82 अंकांनी घसरण अनुभवत 69,539.19 वर स्थिरावला तर निफ्टी 20,901.35 वर बंद झाला. याआधी सोमवारी (दि.11) सेन्सेक्स 69,928 वर बंद झाला होता.