मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एसटीचे (ST employees) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा म्हणून राज्य सरकारने पगारवाढीची घोषणा केली. परंतु या पगारवाढीवरुन कर्मचार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने बुधवारी एसटी महामंडळाने नव्या वेतनाबाबतचे परिपत्रकच काढले.या परिपत्रकात नव्या घोषणेनुसार कोणत्या कर्मचार्याचा पगार किती होणार याची माहिती दिली आहे. यात चालक, वाहकापासून तर मेकॅनिकपर्यंतचे कर्मचारी आणि सेवेच्या वर्षानुसार ही पगारवाढ देण्यात आली आहे.
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर आजही ठाम असल्याने संप सुरुच आहे. महामंडळात बुधवारी फक्त 18 हजार 694 कर्मचारी कामावर हजर राहिले. कर्मचार्यांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने सुधारित वेतनवाढीची माहिती कर्मचार्यांना देण्यासाठी एक परिपत्रकच काढले आहे. (ST employees)
या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि 10 वर्षांच्या कर्मचार्यांना 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. 10 ते 20 वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचार्यांना 4,000 रुपयांची पगारवाढ झाली आहे. तसेच 20 वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचार्यांना 2 हजार 500 रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे महामंडळाचे 439 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील एसटीची वाहतूक आणि कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्याचे प्रमाण अद्यापही कमीच आहे.बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यत राज्यभरात 1 हजार 182 एसटी धावल्या. त्यामध्ये 78 शिवनेरी,199 शिवशाही आणि 1 हजार साध्या एसटीचा समावेश आहे. आजही 73 हजार572 कर्मचारी संपात सहभागी आहेत.
महामंडळाने कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई सुरुच ठेवली आहे. बुधवारी 448 कर्मचारी निलंबित केले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचार्यांची संख्या 8 हजार 643 झाली आहे. तसेच रोजंदारीवरील 65 कर्मचार्यांची सेवा समाप्त झाली. आतापयर्ंत 1 हजार 892 कर्मचार्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
नोव्हेंबर महिन्यात संपामुळे सुमारे 450 कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले. दिवाळीच्या काळात जवळजवळ 80 टक्के वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यावेळी नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल प्रतिदिन 15 कोटीपर्यंत पोचला होता. परंतु 7 नोव्हेंबरनंतर संपाची तीव्रता वाढली आणि सर्वच डेपो बंद झाले.
त्यामुळे एसटीचा महसूल कोटीतून हजारात पोचला. सध्या दिवसभरात 1 हजारपेक्षा जास्त बसेस रस्त्यावर धावत असून यामुळे सुमारे दीड लाखपेक्षा जास्त प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. यातून एसटीला 70 ते 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
विद्यार्थ्यांचे हाल
कोरोनापूर्वी दररोज सुमारे सहा लाख विद्यार्थी एसटीतून प्रवास करायचे. त्यांना 66.66 टक्के इतकी प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या सरासरी 6 लाख 20 हजार विद्यार्थिनी एसटी प्रवास करतात. त्यांना राज्य शासनाकडून 100 टक्के सवलत दिली जाते. परंतु सध्या एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.