Latest

एसटी वाहतूक पुन्हा ठप्प, प्रवाशांचे हाल

Arun Patil

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळत चालला असून, रविवारी राज्यातील एसटीचे तब्बल 150 डेपो बंद राहिले. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक कोलमडली. सोमवारपासून राज्यातील सर्वच 250 डेपो बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून अनेक ठिकाणी एसटी वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, सोमवारी राज्य सरकार उच्च न्यायालयात काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. राज्यातील विविध विभागांतील 59 डेपो शुक्रवारी बंद होते. ती संख्या वाढून शनिवारी 65 पर्यंत पोहोचली, तर रविवारी बंद डेपोंची संख्या थेट 150 वर गेली.

बीड, वर्धा, सांगली, नांदेड, लातूर, परभणी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागात संपाची तीव्रता अधिक आहे. 80 ते 85 टक्के सेवा सुरू असल्याचा दावा महामंडळ करीत असले तरीही तीव्रता वाढत गेल्याने राज्यातील एसटीची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे दिवाळीसणानिमित्त राज्याच्या विविध भागांत गेलेल्या प्रवाशांना परतीच्या प्रवासाचा खोळंबा झाला. त्यातच खासगी ट्रॅव्हल्सनी तिकीट दर वाढविल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

आतापर्यंत या संपाची झळ मुंबई विभागाला बसली नव्हती. मात्र रविवारी परळ आणि मुंबई सेंट्रल आगारांमध्ये संप पाळण्यात आला. परळ डेपोतील कर्मचार्‍यांंनी दुपारी साडेतीनपर्यंत काम बंद आंंदोलन केल्याने या डेपोची वाहतूक ठप्प झाली.

कर्मचार्‍यांवर ताण

संप सुरू असलेले काही डेपो तोट्यातच आहेत, त्यामुळे ते आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा विचार महामंडळ करत आहे. त्यासाठी संप सुरू नसलेल्या जवळच्याच डेपोतून जादा वाहतूक सुरु ठेवण्यात येत आहे. परंतु यामुळे अन्य डेपोंमधील कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनात भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपात सहभागी कर्मचार्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे.

अनेक वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या मागण्या रखडल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने कर्मचार्‍यांशी बोलून त्यांचा प्रश्न तत्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, आमचा न्यायिक प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. एसटी कर्मचार्‍यांचा आक्रोश त्यांच्याही लक्षात आला असेल. परिणामी एसटीचे शासनात विलीनीकरण होण्यासाठी उचित निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.

हिंगोलीत वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगोली : 'मला माफ करा, मी तुमची दिवाळी गोड करू शकलो नाही. तुम्हाला कपडे घेता आले नाहीत,' अशा शब्दांत फोनवरून कुटुंबाची माफी मागत कळमनुरी आगारातील वाहक रमेश टाळकुटे यांनी शनिवारी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुटपुंजे वेतन, त्यातच मागील काही दिवसांत डिझेल नसल्याने आगाराला बस बंद ठेवाव्या लागल्या. त्याचा परिणाम वेतनावर झाला. अत्यंत तुटपुंज्या वेतनावर दिवाळीचा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT