Latest

Sri Lanka Cricket : श्रीलंकन क्रिकेट मंडळ विश्वचषक अपात्रतेची चौकशी करणार

Arun Patil

कोलंबो, वृत्तसंस्था : यंदा भारतात होत असलेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेला थेट संधी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर, लंकन क्रिकेट मंडळाने याची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती नियुक्त केली. मागील महिन्यात हॅमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात पराभूत व्हावे लागल्यानंतर लंका वन डे विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार नाही, हे निश्चित झाले होते. (Sri Lanka Cricket)

लंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंगे यांनी माजी विस्फोटक सलामीवीर सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखाली तांत्रिक समिती जाहीर केली. या समितीत जयसूर्याशिवाय आणखी तीन माजी राष्ट्रीय खेळाडू समाविष्ट आहेत. संघाला वर्ल्डकपसाठी थेट स्थान का मिळवता आले नाही, असे आपण प्रशिक्षण पथकाला विचारणार आहोत, असे जयसूर्याने नमूद केले. (Sri Lanka Cricket)

1996 मध्ये विश्वचषक जिंकणार्‍या लंकेने 1975 नंतर प्रत्येक विश्वचषक स्पर्धा खेळलेली आहे. मात्र, पात्रता स्पर्धेत खेळावे लागण्याची नामुष्की त्यांच्यावर प्रथमच आली आहे. लंकेला मागील महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची मालिका 0-2 अशा फरकाने गमवावी लागली. त्यानंतर ते मानांकनात आठव्या स्थानी फेकले गेले. मानांकनातील पहिले सात संघ आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतात. त्यामुळे लंकेची ही संधी हुकली.

लंकेला आता दि. 18 जून ते 9 जुलै या कालावधीत झिम्बाब्वेत होणार्‍या पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. पात्रता फेरीत केवळ दोनच जागा असून, लंकेला झिम्बाब्वे, विंडीज यांच्याशी यासाठी संघर्ष करावा लागेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत भारतात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT