स्पोर्ट्स

सुनील नरेन मला भावासारखा; गौतम गंभीरने सांगितले दोघांमधील बाँडिंग

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 चे जेतेपद पटकावले. सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी अंतिम सामन्यात मोठा पराभव करत तिसर्‍यांदा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाचा मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीर होता. अंतिम सामना जिंकल्यानंतर मैदानावर सिलेब्रेशन करताना गौतम गंभीर आणि सुनील नरेन यांनी कडकडून मिठी मारली, इतकेच नाही तर दोघांनी एकमेकांना उचलूनही घेतले. या दोघांमधील बाँडिंग प्रेक्षकांना चांगलेच भावले. याबद्दल बोलताना गंभीरने सांगितले की, सुनील मला भावासारखा आहे. दोघांना काहीही अडचण आली तर आम्ही फक्त एक कॉल दूर आहोत.

केकेआरच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीचे श्रेय गंभीरलाही दिले जात आहे. गौतम गंभीरने स्टार अष्टपैलू सुनील नरेनचे खूप कौतुक करत त्याचा एक किस्सा सांगितला. नरेनची आयपीएल 2024 चा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू म्हणून निवड झाली. नुकत्याच झालेल्या संभाषणात, गंभीरने नरेनसोबतच्या मैत्रीबद्दल खुलासा केला आणि केकेआर कॅम्पमधील नरेनचे सुरुवातीचे दिवस कसे होते याच्याबद्दल त्याने सांगितले. 2012 आणि 2014 मध्ये केकेआरने आयपीएलची ट्रॉफी जिंकली तेव्हा गंभीर केकेआरचा कर्णधार होता, नरेनने संघाच्या या दोन्ही विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गंभीरने पुढे नरेन त्याचा सहकारी नव्हे तर भाऊ असल्याचे तो म्हणाला. पहिल्या सत्रात तो खूप शांत होता, पण आता आम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकतो. तो माझ्यासाठी भावासारखा आहे. मी त्याच्याकडे एक मित्र किंवा सहकारी म्हणून पाहत नाही, मी त्याच्याकडे एक भाऊ म्हणून पाहतो. जर मला त्याची गरज असेल किंवा त्याला माझी गरज असेल तर मला असे वाटते की आम्ही फक्त कॉल दूर आहोत, आम्ही इतकं बाँडिंग निर्माण केले आहे. आम्ही फार उत्साही होत नाही. आम्ही उघडपणे आमच्या भावनाही दाखवत नाही. आम्ही कसला दिखावादेखील करत नाही, आम्ही फक्त आमचे काम करतो आणि परत येतो, असे गंभीरने नरेन आणि त्याच्या बाँडिंगविषयी बोलताना सांगितले.

लाजाळू सुनील

नरेन आणि मी सारखेच आहोत. 2012 मध्ये नरेन पहिल्यांदा आयपीएलमध्ये आला तेव्हा तो जयपूरमध्ये होता आणि आम्ही सरावासाठी जात होतो, हा प्रसंग मला अजूनही आठवतो. मी त्याला जेवायला यायला सांगितले होते. तो इतका लाजाळू होता की लंच दरम्यान तो एक शब्दही बोलला नाही आणि शेवटी त्याने पहिला प्रश्न विचारला- मी माझ्या गर्लफ्रेंडला आयपीएलमध्ये घेऊन येऊ शकतो का?

केकेआरसाठी नेहमीच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर

नरेन नेहमीच केकेआरचा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू राहिला आहे. मी त्याच्याबद्दल काय सांगू? 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर'चा पुरस्कार जरी जिंकला नसता तरी तो आमच्यासाठी मोस्ट व्हॅल्युएबलच असता. तुम्ही त्याची आकडेवारी पाहा. हंगाम सुरू होण्यापूर्वीच तो केकेआरचा महत्त्वाचा खेळाडू होता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जगाने त्याची प्रतिभा पाहिली आहे आणि मला खात्री आहे की नरेनकडे अजूनही केकेआर आणि जागतिक क्रिकेटला देण्यासारखे बरेच काही आहे, असे शेवटी बोलताना गंभीरने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT