स्पोर्ट्स

श्रीलंका ‘आशिया’ सम्राट

दिनेश चोरगे

दुबई; वृत्तसंस्था :  आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात झुंजार आणि जिगरबाज श्रीलंकेने पाकिस्तानवर 23 धावांनी मात करून 'आशियाचे क्रिकेट सम्राट' आपणच असल्याचे सिद्ध केले. निम्मा संघ 58 धावांत माघारी परतूनही श्रीलंकेने दमदार खेळ केला. वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षा (71) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजावर केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे श्रीलंकेला 6 बाद 170 धावा करता आल्या. त्यानंतर पाकिस्तानला त्यांनी 147 धावांत गुंडाळले. श्रीलंकेच्या प्रमोद मधुशान याने 4 तर वानिंदू हसरंगा याने 3 विकेटस् घेतल्या. या विजयाने श्रीलंकेचा आठ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला. आशिया चषक स्पर्धेतील हे श्रीलंकेचे सहावे विजेतेपद आहे.

दुबईच्या स्टेडियमवर रविवारी झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या पाकिस्तानला लंकेच्या दिलशान मधुशनकाने 12 धावा दिल्या, पण प्रमोद मधुशान याने आपल्या पहिल्या षटकात कर्णधार बाबर आझम (5) आणि फखर झमान (0) यांना बाद केले. या दोन धक्क्यानंतर इफ्तिकार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला. शेवटी ही जोडी फोडण्यासाठी प्रमोद मधुशानला यावे लागले. त्याने इफ्तिकारला (32) बाद केले. रिझवान-इफ्तिकारने 59 चेंडूंत 71 धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध मॅचविनिंग कामगिरी करणार्‍या मोहम्मद नवाझला करुणारत्ने याने 6 धावांवर बाद केेले.

यानंतर वानिंदू हसरंगाने आपल्या शेवटच्या षटकांत पहिल्या चेंडूवर धोकादायक मोहम्मद रिझवानला बाद केले. रिझवानने 49 चेंंडूंत 55 धावा केल्या. याच षटकांत असिफ अली (0) आणि खुशदिल शाह (2) यांना बाद करून पाकच्या मुसक्या आवळल्या. महेश तिक्ष्णाने शादाब खानला बाद करून पाकच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. शेवटच्या चेंडूवर हॅरीस रौफही बाद झाल्याने पाकचा संघ 147 धावांत डाव संपुष्टात आला. तत्पूर्वी, पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नसीम शाहने पहिल्या षटकात श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पथुम निसंका व धनंजया डी सिल्वा यांनी 21 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चौथ्या षटकात हॅरीस रौफच्या चेंडूवर निसंकाने (11) मारलेला फटका चुकला, अन् बाबरने झेल घेतला. पुढच्या षटकात रौफने दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला.

इफ्तिखार अहमद व शादाबने त्यानंतर प्रत्येकी 1 विकेट घेत श्रीलंकेचा निम्मा संघ 58 धावांत माघारी पाठवला. शादाबने दासुन शनाकाचा (2) त्रिफळा उडवला. 10 षटकांत लंकेच्या 5 बाद 67 धावा झाल्या होत्या. यानंतर मात्र चित्र बदलले. वानिंदू हसरंगा व राजपक्षा यांनी श्रीलंकेची धावगती वेगाने वाढवली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : 20 षटकात 6 बाद 170 धावा. (भानुका राजपक्षा 71, वानिंदू हसरंगा 36. हॅरिस रौफ 3/29, शादाब खान 1/28.) पाकिस्तान : 20 षटकात सर्वबाद 147 धावा. (मोहम्मद रिझवान 55, इफ्तिकार अहमद 32. प्रमोद मधुशान 4/34, वानिंदू हसरंगा 3/27.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT