स्पोर्ट्स

शुभमन गिलचे अर्धशतक

अमृता चौगुले

लिसेस्टर : वृत्तसंस्था :  भारताचा सलामीवीर शुभमन गिल याने लिसेस्टर संघाकडून मैदानात उतरून फलंदाजीचा चांगलाच सराव केला. त्याने अर्धशतक करताना तडाखेबंद 62 धावा केल्या. त्याच्यासोबत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विनही गोलंदाजीत चमकला, त्याने दोन विकेटस् आपल्या नावावर केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लिसेस्टरने 4 बाद 219 धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णीत राहिला.

इंग्लंडमधील लिसेस्टर मैदानावर सुरू असलेल्या चार दिवसीय सराव सामन्यात भारताने तिसर्‍या दिवसअखेरीस 7 बाद 364 धावांवर डाव घोषित केला. रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी हसन आझाद आणि शुभमन गिल यांनी लिसेस्टरच्या डावाला सुरुवात केली. आझादला शार्दुल ठाकूरने 12 धावांवर बाद केले. त्यानंतर गिलला साथ देण्यासाठी कर्णधार सॅम्युएल एव्हान्स आला.

अर्धशतक करणार्‍या शुभमन गिलला अश्‍विनने बाद केले. त्यानंतर अत्यंत सावध खेळणार्‍या सॅम्युएलला अश्‍विनने बाद केले. दोन विकेटस् घेतल्यामुळे अश्‍विनचा आत्मविश्‍वास नक्‍कीच बळावला असेल. त्यानंतर हनुमा विहारी यानेही प्रतिस्पर्धी संघाकडून फलंदाजीचा सराव केला; परंतु 26 धावांवर रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लिसेस्टर संघाने 4 बाद 219 धावा केल्या होत्या.

रविचंद्रन अश्‍विन याला कोरोना झाल्यामुळे तो संघात उशिरा दाखल झाला होता. रविवारी तो संघासोबत जोडला गेला आणि थेट मैदानावर उतरला. त्याने पहिल्याच सराव सामन्यात चांगली गोलंदाजी केली.

कमलेशला पिडणार्‍या चाहत्याला विराटने झापले
भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यात चार दिवसीय सराव सामन्यात 7 भारतीय खेळाडू सराव सामन्यात घरच्या लिसेस्टरशायर संघाकडूनही खेळत आहेत. लिसेस्टरशायरसाठी जसप्रीत बुमराह, चेतेश्‍वर पुजारा, प्रसादी कृष्णा, कमलेश नागरकोटी, नवदीप सैनी, ऋषभ पंत आणि साई किशोर आहेत.

सराव सामन्याच्या दुसर्‍या दिवशी एक रंजक घटना घडली. लिसेस्टरशायरकडून गोलंदाजी करणारा कमलेश नागरकोटी सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ उभा क्षेत्ररक्षण करत होता, त्याचवेळी स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी फोटो काढण्याची मागणी सुरू केली. मात्र, हा सर्व प्रकार पाहून विराट कोहली स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने बाल्कनीत उभे राहून प्रेक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीला एका चाहत्याने म्हटले की, मी कधीपासून बोलावतोय तो फोटो काढत नाहीये. मी काम सोडून इथे आलो आहे. निदान फोटो तरी काढावा. मी नगरकोटीला बोलावतोय. तर पॅव्हेलियनच्या बाल्कनीत उभा राहून कोहली म्हणाला, तो मॅच खेळायला आलाय की फोटो काढायला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT