कराची ; वृत्तसंस्था : कोणत्याही दौर्यासाठी पाकिस्तानची संघ निवड हा त्या देशात नेहमी एक वादाचा मुद्दा बनलेला असतो. त्या संघात एक-दोन खेळाडू आऊटऑफ फॉर्म असतात किंवा वशिल्याने आलेले असतात. आता नेदरलँड दौर्याविषयीही असाच विवाद निर्माण झाला आहे. या दौर्यासाठी पाकिस्तान संघात मोहम्मद हारिस नावाच्या युवा खेळाडूला निवडण्यात आले आहे. त्याच्या निवडीबद्दल माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने बोर्डावर तोंडसुख घेतले आहे.
शाहिद आफ्रिदी म्हणाला, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेला निर्णय अतिशय मूर्खपणाचा होता. पाक बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना मी काही सांगायला जाणार नाही; पण मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांना मी नक्कीच सल्ला देईन.
जर मोहम्मद वसीम ऐकत असतील, तर मी त्यांना सांगू इच्छितो की, अशा पद्धतीचे पाऊल त्यांनी पुन्हा उचलू नये. तुम्ही वन-डे क्रिकेटमध्ये मोहम्मद हारिस याच्यासारखा खेळाडू कसा काय निवडता, जो केवळ दोन टी-20 सामने खेळला आहे. त्यातही त्याची कामगिरी चांगली नाही.
हारिसची निवड टी-20 कामगिरीच्या आधारे झाली असेल, तर त्याला टी-20 मध्ये खेळवा. तरुण खेळाडूंच्या समावेशाला माझाही पाठिंबा आहे; पण किमान त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळू द्या, असे आफ्रिदीने म्हटले आहे.