स्पोर्ट्स

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : स्वप्निल-अषिचा सुवर्णनेम

Arun Patil

बाकू ; वृत्तसंस्था : भारताच्या स्वप्निल कुसाळे आणि अषि चौक्सी यांनी विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 50 मी. रायफल ध्री पोझिशन प्रकारात मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले. भारताचे हे दुसरे सुवर्णपदक असून स्पर्धेत भारत दुसर्‍या क्रमांकावर रहिला. कोरिया प्रथम स्थानी राहिला. स्वप्निल हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (ता. राधानगरी) गावचा आहे.

अझरबैझानमधील बाकू शहरात ही स्पर्धा भरवण्यात आली होती. स्पर्धेचा शनिवारी शेवटचा दिवस होता. या स्पर्धेत पिस्टल आणि रायफल या दोन्ही प्रकारचे सामने असले तरी भारताचा फक्त रायफल खेळाडूंचा 12 जणांचा चमू सहभागी झाला होता. स्पर्धेत पहिल्यांदा महिला संघाने सुवर्णपदक पटकावले, त्यानंतर स्वप्निल कुसाळे व अंजुम मुदगील यांनी वैयक्तिक रौप्यपदक पटकावले. याशिवाय मुलांच्या थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निलसह गोल्डी गुर्जर आणि दीपक कुमार यांनी रौप्यपदक मिळवले होते.

शनिवारी मिश्र सांघिक गटात स्वप्निल आणि अषि यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत युक्रेनच्या सेर्‍ही कुलीश आणि दारिआ आणि तायखोवा जोडीचा 16-12 असा पराभव केला. स्पर्धेत तीन पदके मिळवणार्‍या स्वप्निलचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.

मिश्र दुहेरीच्या पहिल्या पात्रता फेरीत स्वप्निल-अषि जोडीने 900 पैकी 881 गुण मिळवून चौथे स्थान मिळवले होते. दुसर्‍या पात्रता फेरीत त्यांनी दुसरे स्थान गाठले. यावेळी त्यांनी 600 पैकी 583 गुण मिळवले. अंतिम सामन्यात युक्रेनच्या जोडीने पहिल्या चार शॉटनंतर 6-2 अशी आघाडी घेतली होती. भारतीय जोडीने नंतर मात्र पुढील 8 शॉटस्पैकी सहा शॉटस् जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले.

SCROLL FOR NEXT