स्पोर्ट्स

लालचंद राजपूत म्हणाले अफगाण क्रिकेटचे भवितव्य टांगणीला

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सध्याची अफगाणिस्तानातील राजकीय परिस्थिती बिकट झाली आहे. देशाचेच भवितव्य टांगणीला लागल्याने तूर्तास अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडे परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंतवाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे अफगाणिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानातील विद्यमान राजकीय संघर्षात तालिबान्यांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. त्यामळे तेथील खेळाडूंचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजपूत यांनी थेट आयर्लंडमधून दै. 'पुढारी'शी संवाद साधला. लालचंद राजपूत हे सध्या झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने जेव्हा 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा राजपूत हेच भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी होते. त्यानंतर ते 2016 मध्ये अफगाणिस्तान संघांचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली.

राजपूत यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात अफगाणिस्तानचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडू शकले. मात्र, सध्याची अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक झाल्याने अनेक खेळाडू देश सोडून परदेशात आसरा शोधत आहेत. त्यामुळे तेथील क्रीडा क्षेत्र संकटात सापडल्याने राजपूत यांनी खास संवाद साधत अफगाणिस्तानातील खेळाडूंना धीर दिला.

अफगाणिस्तानसोबतच्या प्रशिक्षक अनुभवाबाबत काय सांगाल?

अफगाणिस्तानसोबत काम करण्याचा अनुभव हा चांगला होता. त्या संघातील अनेक खेळाडूंना चांगले हिंदी बोलता येत होते. हा देश नेहमी युद्धाच्या सावटाखाली राहिला आहे.

मात्र, अफगाण खेळाडू हे कठोर परिश्रम घ्यायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून काम करताना आनंद यायचा. संघ म्हणून आम्हाला चांगले यशदेखील मिळाले आणि खेळाडूंनी कामगिरीत सातत्य राखल्याने संघाला कसोटी दर्जादेखील मिळाला.

अफगाणिस्तान संघाची सध्याच्या कामगिरी कशी आहे?

पूर्वी अफगाणिस्तान खेळाडूंना म्हणावे तसे प्रोत्साहन मिळायचे नाही. त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या सर्व अडचणीतून बाहेर पडत त्यांनी क्रिकेटला आपलेसे केले आणि संघातील खेळाडूंनी जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली.

संघाला कसोटी दर्जा मिळाल्यानंतर देशात क्रिकेटच्या बाबतीत अनेक सुधारणा झाल्या. अफगाणिस्तानला मी प्रशिक्षक असताना भारतात सराव करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तान क्रिकेटचे भवितव्य काय?

इतक्या कमी वेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तान संघाने छाप सोडली आहे. तालिबान क्रिकेटला किती महत्त्व देतात यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. यापूर्वीच हे खेळाडू आपल्या देशात खेळत नव्हते. त्यांना मायदेशातील परिस्थितीमुळे सर्व सामने देशाबाहेर खेळावे लागले.

सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास नुकसान खेळाडूंचे होणार आहे. प्रशिक्षक आणि माजी खेळाडू म्हणून खेळ सुरू राहिला पाहिजे असे मला वाटते; पण सध्याच्या परिस्थितीत प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

SCROLL FOR NEXT