स्पोर्ट्स

रोहितच्या गैरहजेरीत कर्णधार कोण?

backup backup

लंडन ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोना झाल्यामुळे यजमान इंग्लंडविरुद्ध 1 जुलैपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीत तो खेळेल की नाही याभोवती प्रश्‍नचिन्ह लागले आहे. अशा परिस्थितीत कप्‍तानपद कोणाकडे सोपवायचे, असा यक्षप्रश्‍न भारताच्या संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे.

जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून चर्चा होत आहे. पण, त्याने आतापर्यंत क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर संघाचे नेतृत्व केलेले नाही. बुमराहनंतर भारताकडे ऋषभ पंतच्या रूपाने दुसरा पर्याय आहे. पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही त्याने नेतृत्वपद सांभाळले होते. मात्र, त्याने पहिल्या संधीत आपल्या नेतृत्वाने प्रभावित केलेले नाही. तिसरा पर्याय आहे तो विराट कोहली. कोहलीने भारताचे कर्णधारपद सोडले आहे. मात्र, या कसोटीचे महत्त्व लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन त्याला एका सामन्याचे नेतृत्व करण्याची विनंती करू शकते.

गिलसोबत सलामीला कोण?

रोहित संघाचा कर्णधारच नाही तर सलामीवीर देखील आहे. आणि इंग्लिश वातावरणात सलामीला उतरणे खूप आव्हानात्मक असते. अशा स्थितीत रोहित खेळला नाही तर गिलसोबत सलामी कोण उतरणार, असा मुद्दा निर्माण झाला आहे. यासाठी भारताकडे मयंक अग्रवाल, श्रीकर भरत आणि चेतेश्‍वर पुजारा असे तीन पर्याय आहेत. पुजारा तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करत असला तरी तो सलामीला उतरण्याएवढा सक्षम आहे. पुजाराने यापूर्वी 6 वेळा सलामीला फलंदाजी केली आहे.

श्रेयस अय्यरने कारकिर्दीतील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटी क्रिकेटमध्ये तो शानदार फॉर्ममध्ये होता. श्रेयस सध्या पाचव्या क्रमांकावर स्थिरावला आहे. मात्र, भारतीय संघ पाच गोलंदाजांसह उतरला तर अय्यर आणि हनुमा विहारीपैकी एकालाच अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकेल. इंग्लंड दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी आर अश्‍विन कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यातून बरा झाल्यानंतर तो संघात सामील झाला आहे. त्याला तरी अंतिम संघात स्थान मिळणार काय, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. गतवर्षी त्याला इंग्लंडविरुद्धच्या चारपैकी एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नव्हती.

इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक

कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे 1 ते 5 जुलैदरम्यान. त्यानंतर पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाऊल येथे, दुसरा टी-20 सामना 9 जुलै रोजी एजबॅस्टन येथे तर तिसरा टी-20 सामना 10 जुलै रोजी ट्रेंट ब्रिज येथे होईल. या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामने होणार असून त्यातील पहिला सामना 12 जुलैला ओव्हल मैदानावर, दुसरा सामना 14 जुलैला लॉर्डस् मैदानावर तर तिसरा आणि अंतिम सामना 17 जुलैला मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT