मुंबई ; वृत्तसंस्था : तब्बल पाच वेळा अजिंक्य ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची अवस्था यंदाच्या आयपीएलमध्ये दयनीय बनली आहे. नुकताच त्यांनी लागोपाठ सहावा सामना गमावला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा निराश झाला आहे. मात्र, पुढच्या सामन्यात आम्ही पुनरागमन करू, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
रोहित शर्मा म्हणतो, जेव्हा आपण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतो, तेव्हा मोठी भागीदारी होणे गरजेचे असते. आम्हाला एकही मोठी भागीदारी करता आली नाही. जसप्रीत बुमराहला इतर गोलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे धावा रोखण्यात अपयश आले. टी-20 चा खेळ फक्त कोणत्याही एका षटकात बदलू शकतो. आम्ही आतापर्यंत सहा सामने गमावले आहेत. आम्ही बेस्ट प्लेईंग 11 कोणती असेल, याची पडताळणी करत आहोत.
लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने दमदार फलंदाजी केली. आमच्या संघात काही कमतरता आहे. आघाडीच्या चार फलंदाजांपैकी एकाने मोठी खेळी करायला हवी. सध्या तसे होत नाही. आम्ही आतापर्यंत एकही सामना जिंकलो नाही, पण उर्वरित सामन्यांत जिंकण्याचा प्रयत्न करू, असे रोहित म्हणाला.
सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असेच समीकरण बनले आहे. मात्र, मुंबईने लखनौविरुद्ध प्रथम गोलंदाजी घेऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला. याचे कारण लखनौचा तडफदार खेळ. राहुलने ठोकलेल्या शतकामुळे मुंबईसमोर 200 धावांचे लक्ष्य होते. राहुलने 60 चेंडूंत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.
मुंबईचे गोलंदाज खराब कामगिरी करतच होते. त्यात मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकांत 54 धावा मोजाव्या लागल्या. 200 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचे सलामीवीर अपयशी ठरले. रोहित शर्मा सहा तर इशान 13 धावा करू शकला.
संघ अडचणीत असताना तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी रचली, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. अखेरच्या काही षटकांत कायरान पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याची 25 धावांची खेळी अंतिमतः निष्फळ ठरली. सुमार फलंदाजी आणि दुबळी गोलंदाजी यामुळे मुंबईच्या पदरी आणखी एक लाजिरवाणा पराभव पडला.