बंगळूर ; वृत्तसंस्था : ऋषभ पंत हा भारताच्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या नियोजनातील अविभाज्य घटक आहे, एका मालिकेतील कामगिरीच्या जोरावर त्याचे मूल्यमापन करू नका, असे विधान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. द्रविड म्हणाला, 'वैयक्तिकरीत्या, त्याला आणखी काही धावा करायला आवडेल, पण ही गोष्ट त्याला सतावत नाही. तो आमच्या भविष्यातील योजनांचा खूप मोठा भाग आहे.'
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ऋषभला 105 च्या स्ट्राईक रेटने 58 धावाच करता आल्या आहेत. अशात राहुल द्रविडने त्याच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघातील स्थानाबाबत मोठे विधान केले आहे.
मधल्या फळीतील त्याचे महत्त्व द्रविडने पटवून दिले. 'मी फक्त टीका करू इच्छित नाही. मधल्या षटकांमध्ये तुम्हाला आक्रमक खेळ करणारा फलंदाज हवा असतो, जो सामना वेगाने पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे दोन किंवा तीन सामन्यांच्या कामगिरीवर एखाद्याला जज करणे चुकीचे आहे,' असे द्रविडने स्पष्ट केले.
तो पुढे म्हणाला, 'इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऋषभने चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये त्याने फलंदाजीत वरच्या क्रमांकावर येताना सरासरी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडून आणखी चांगले काम पाहायला मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.'
'आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात, त्याच्याकडून काही सामन्यांत चुका झाल्या असतील, परंतु तो आजही संघाचा अविभाज्य घटक आहे. मधल्या फळीत डावखुर्या फलंदाजाचे असणे महत्त्वाचे आहे. त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत,' असे द्रविड म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. तो फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही आणि एकाच पद्धतीने त्याने विकेट फेकली. अशात 37 वर्षीय दिनेश कार्तिक दमदार पुनरागमन करून सातत्याने धावा करतोय आणि संघाला जिंकून देतोय. यामुळे ऋषभबरोबर त्याची तुलना केली जात आहे.
द्रविड गुरुजींकडून दिनेश कार्तिकचे कौतुक
* टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राजकोटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने खेळलेल्या जबरदस्त खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकने राजकोटमध्ये त्याच्या शानदार खेळीने त्याची निवड का करण्यात आली हे दाखवून दिल्याची कौतुकास्पद टिप्पणी द्रविड गुरुजींनी केली आहे.
* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कार्तिकने चार डावांत 158.62 च्या स्ट्राईक रेटने 92 धावा केल्या. यादरम्यान त्याने राजकोटमध्ये 27 चेंडूंत 55 धावांची मॅचविनिंग इनिंगही खेळली.
* एका मुलाखतीत मुख्य प्रशिक्षक द्रविड म्हणाले की, कार्तिक चमकदार कामगिरी करत आहे हे पाहून मी खूश आहे. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी अनेक पर्याय खुले झाले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.