पुढारी ऑनलाईन डेस्क : Rachin Ravindra Injury : न्यूझीलंडचा फलंदाज राचिन रवींद्रला शनिवारी (दि. 8) पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात गंभीर दुखापत झाली. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. पाकचा संघ फलंदाजी करताना 38 व्या षटकात रवींद्र झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना फ्लडलाइट्सच्या कमी प्रकाशामुळे त्याला चेंडू नीट दिसला नाही आणि तो थेट कपाळावर आदळला. या घटनेनंतर रचिन काही सेकंदांसाठी जमिनीवर डोके झुकवून बसला. त्यांच्या चेहऱ्यावरून रक्तस्त्राव होत होता, ज्यामुळे स्टेडियममध्ये शोककळा पसरली.
यानंतर मेडिकल टीम त्वरित मैदानात आली आणि रचिनला उपचार दिले. गंभीर दुखापत असल्याने त्याला त्वरित मैदानाबाहेर नेण्यात आले. यादरम्यान रचिनच्या तोंडावर टॉवेल होता. मैदानाबाहेर जाताना गद्दाफी स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून आणि टाळ्या वाजवून रचिनला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रचिनच्या दुखापतीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) दोषी ठरविण्यात आले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गंभीर आरोप केले आहेत. पीसीबीने खेळाडूंच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतलेली नाही. ज्यामुळे रचिनला दुखापत झाली, असे न्यूझीलंडने म्हटले आहे. त्याचबरोबर, जर पाकिस्तान क्रिकेट मंडळ खेळाडूंच्या सुरक्षेची योग्य काळजी घेऊ शकत नसेल, तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दुबईमध्ये हलवावी, अशी मागणीही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ICC ला केली आहे. या प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. परिणामी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रचिनला कपाळावर जखम झाली आहे, ज्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती चांगली आहे. तो पहिली हेड इन्क्युरी असेसमेंट (HIA) उत्तीर्ण झाला आहे. यापुढे तो वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली असेल. त्यामुळे द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांचा सहभाग शक्य नाही, अशी माहिती न्यूझीलंड बोर्डाने रविवारी दिली.