नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : '2006 मध्ये कराची कसोटीत आपण सचिनचे चेंडूने डोके फोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत होतो,' अशी कबुली पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दिली आहे. एका क्रीडा वेबसाईटशी गप्पा मारताना शोएबने हा किस्सा सांगितला आहे. हा तोच कसोटी सामना आहे, ज्यामध्ये भारताच्या इरफान पठाणने पहिल्या षटकात हॅट्ट्रिक घेतली होती.
2006 मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौर्यावर गेला होता. त्या दौर्यातील तिसरा कसोटी सामना कराची येथे खेळवण्यात आला होता. त्यावेळी शोएब अख्तर आपल्या जबरदस्त वेगासाठी आणि आक्रमकपणासाठी ओळखला जात असे. आपल्या याच गुणांचा वापर करून तो सचिन तेंडुलकरला जखमी करू इच्छित होता.
याबाबत शोएब म्हणाला, मी पहिल्यांदाच हे जाहीरपणे सांगत आहे. त्या कसोटी सामन्यात मला जाणूनबुजून सचिनला मारायचे होते. सचिनला कोणत्याही किमतीत जखमी करण्याचा मी निश्चय केला होता. तत्कालीन कर्णधार इंझमाम मला सरळ विकेटस्समोर गोलंदाजी करण्यास सांगत होता. पण, मला तर सचिनला जखमी करायचे होते. म्हणून मी त्याला त्याच्या हेल्मेटवर चेंडू मारले. त्यानंतर त्याच्या डोक्याला लागले असेल म्हणून मला आनंदही झाला होता. पण, जेव्हा मी पुन्हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मला दिसले की सचिन त्याचे डोके वाचवण्यात यशस्वी झाला होता.
अख्तरने पुढे सांगितले की, तो तेंडुलकरला जखमी करण्याच्या प्रयत्नात असताना सारे भारतीय फलंदाज बॅकफूटवर गेले. त्याचा फायदा उठवत दुसर्या बाजूने वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने भारतीय फलंदाजांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीचा टिकाव लागला नाही. कराचीतील कसोटी सामन्यात सचिनला पहिल्या डावात अब्दुल रझाकने 23 धावांवर आणि दुसर्या डावात आसिफने 26 धावांवर बाद केले होते. भारताने ही लढत 341 धावांनी गमावली होती.