स्पोर्ट्स

यशपाल शर्मा १९८३ च्या यशाचा ‘यश’पाल

Arun Patil

कुठल्याही पहिल्यांदा मिळालेल्या मोठ्या यशाची आठवण आयुष्यभर सुखावत असते. त्याप्रमाणे 1983 च्या पहिल्या विश्वचषक विजयाची गोडी वेगळीच आहे. हा विश्वचषक विजेता संघ नुसता मैदानावरचाच संघ नव्हता तर ते एक मोठे कुटुंब होते. मंगळवारी या कुटुंबाचा सभासद यशपाल शर्मा बाद झाल्याने या कुटुंबाला एक मोठा धक्का बसला आहे. मी याला कुटुंब का म्हणतो याचा एक किस्सा सांगतो.

दोन वर्षांपूर्वी मी मुंबई – कर्नाटक रणजी सामना बघायला त्या विश्वचषक विजयाचे एक शिलेदार बलविंदरसिंग संधूंबरोबर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर बसलो होतो. समोर मैदानात चाललेली मुंबईची वाताहत बघवेना म्हणून आमच्या गप्पा अर्थातच 1983 च्या विश्वचषकाकडे वळल्या.

कबीर खानच्या '83' या चित्रपटाचे मुख्य सल्लागार असलेले संधू त्यांच्या विश्वचषकतल्या एकेक साथीदाराबद्दल इतके भरभरून बोलत होते की जणू काही हे एक मोठे कुटुंब आहे असेच वाटत होते. यशपाल शर्मा तर त्यांचा रूममेट होता.

त्या 1983 च्या विश्वचषकाबाबतीत बोलायचे तर अंतिम सामन्याबद्दल खूप बोलले जाते. मात्र, त्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी पहिला विजय कारणीभूत होता. तो साखळी सामन्यातील वेस्ट इंडीजविरुद्धचा.

वेस्ट इंडीजने विश्वचषकात तोपर्यंत पराभव हा बघितलेलाच नव्हता. त्यांचा अश्वमेघ रोखला तो भारताने आणि त्यातही लगाम खेचून तो थांबवला तो यशपाल शर्माने. यशपाल शर्मा च्या 89 धावांनी भारताला विजयी केलेच; पण एकदिवसीय सामन्यात आपण वेस्ट इंडीजला हरवू शकतो हा आत्मविश्वास दिला.

या सामन्यात गावस्कर, मोहिंदरसारखे खंदे वीर बाद झाल्यावर होल्डिंग, मार्शल, रॉबर्टस् आणि गार्नर या धडकी भरवणार्‍या आक्रमणाविरुद्ध त्याने 120 चेंडूंत या 89 धावा फटकावल्या. यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 चेंडूंत 40 धावा आणि सर्वात महत्त्वाची खेळी म्हणजे उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध 61 धावा करून यशपाल शर्मा यांनी भारताला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात हातभार लावला.

कसोटीत द्रविड-लक्ष्मणने 'त्या' ऐतिहासिक कोलकाता कसोटीत पूर्ण दिवस खेळून काढायच्या आधी 1982 च्या इंग्लंडविरुद्धच्या मद्रास कसोटीचा दुसरा दिवस गुंडाप्पा विश्वनाथ आणि यशपाल शर्मा ने खेळून काढत 316 धावांची महाभागीदारी केली होती.

यशपाल शर्मा म्हटले की, पाहिले डोळ्यासमोर येते ती लढवय्या वृत्ती. त्याकाळी क्रिकेटमध्ये आजच्या इतके फिटनेसचे महत्त्व नव्हते; पण सडसडीत शरीर नसले तरी यशपाल शर्मा सर्वात फिट होते. त्याकाळी एकंदरीतच फिटनेस हा गंभीरतेने घ्यायचा विषय नव्हता.

यशपाल शर्मा त्याकाळी चेंडूचा सीमारेषेपर्यंत चित्त्याच्या वेगाने पाठलाग करणारे भारतीय संघातील अपवादात्मक खेळाडू होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हे फिटनेसचे महत्त्व जपले होते.

शाकाहारी, निर्व्यसनी यशपाल शर्मा आपला मॉर्निंग वॉक कधीच चुकवायचे नाहीत. इतक्या फिट क्रिकेटपटूचा असा अंत चटका लावून जाणारा आहे. विशेषतः त्यांच्या 1983 च्या सहकार्‍यांसाठी तर जास्तच. '83' चित्रपट केव्हाच तयार आहे; पण इतका भव्य पराक्रम भव्य पडद्यावरच दिसला पाहिजे म्हणून चित्रपटगृहे खुली होण्याची वाट पहात आहे.

दुर्दैवाने हा चित्रपटरूपी पुनर्प्रत्ययाचा आनंद आणि कौतुक पहायला यशपाल शर्मा नाहीत. दिलीपकुमारचे निस्सीम चाहते असणारे यशपाल शर्मा दिलीपकुमारचा मागोवा घेत गेले हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल.

निमिष पाटगावकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT