स्पोर्ट्स

यंदाच्या फिफा विश्वचषकावर आफ्रिकन खेळाडूंचाच ठसा

मोहन कारंडे

पॅरिस; वृत्तसंस्था : फिफा विश्वचषकाचा रोमांच समाप्त झाला आहे. मात्र, मैदानावर हा रोमांच आणण्याचे श्रेय मूळ आफ्रिकन खेळाडूंना जाते. यजमान कतारसह तब्बल 14 संघांमध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश होता आणि त्यांनीच या स्पर्धेवर स्वतःचा ठसा उमटवला.

मूळ आफ्रिकन असतानाही हे खेळाडू दुसर्‍या देशांकडून खेळतात. विश्वचषक 2018 मधील विजेता आणि यंदाच्या उपविजेत्या फ्रान्स संघात सर्वाधिक मूळ आफ्रिकन खेळाडूंचा समावेश होता. यंदाच्या विश्वचषकात एकूण 32 संघांपैकी यजमान कतार, फ्रान्स, जर्मनी, स्पेनसह 14 संघांत आफ्रिकन खेळाडू होते. फ्रान्सने यंदा आपल्या संघात 14 जणांचा समावेश केला होता, तर 2018 मध्ये 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आफ्रिकन देशांचे संघ जगातील सर्वोत्कृष्ट देशांच्या संघांविरुद्ध नियमित सामने खेळत नाहीत. त्यामुळे आफ्रिकन देशांची दावेदारी मागे पडली आहे. अव्वल अफ्रिकन देशांचे 20 टक्क्यांपेक्षा कमी सामने तगड्या देशांच्या संघांशी होतात. त्यामुळे आफ्रिकन देशांचे खेळाडू युरोपमधील समृद्ध देशांकडून खेळणे पसंत करतात.

निरीक्षकांमार्फत गुणवत्ता शोध

इंग्लिश प्रीमियर लीग, बुंदेस लीगा, ला लीगासह अनेक युरोपियन लीगमधील मोठे संघ आपले निरीक्षक आफ्रिकन देशांत पाठवून तेथील युवा गुणवत्ता शोधतात. त्याचबरोबर आफ्रिकन खेळाडूंनादेखील मोठ्या क्लबकडून खेळण्याची संधी मिळते. कमी वयात इतर देशांतील क्लब अकादमीमध्ये आलेले आफ्रिकन खेळाडू काही काळानंतर तेथील नागरिकत्व मिळवून संबंधित देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळतात.

यंदाच्या विश्वचषकातील मूळ आफ्रिकन खेळाडू देश आणि संख्या

फ्रान्स – 14, कतार – 9, जर्मनी – 7, बेल्जियम – 6, स्वित्झर्लंड – 6, पोर्तुगाल – 5, नेदरलँड – 4,
कॅनडा – 4, वेल्स – 3, अमेरिका – 3, स्पेन – 3, डेन्मार्क – 2, ऑस्ट्रेलिया – 2 इंग्लंड -1.

एमबाप्पेचे पूर्वजही आफ्रिकनच

फ्रान्सचा किलियन एमबाप्पे हा नामांकित खेळाडू असून यंदाच्या विश्वचषकात त्याने 8 गोल झळकावले. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणार्‍या एमबाप्पेचे पूर्वजही मूळ आफ्रिकन आहेत. त्याचे वडील विल्फ्रेड हे कॅमेरूनचे आहेत, तर त्याची आई फैजा लामारी अल्जेरियन आहे. त्याचे वडील फुटबॉल प्रशिक्षक असून, आई माजी हँडबॉल खेळाडू आहे.

SCROLL FOR NEXT