स्पोर्ट्स

मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्डला ‘टाटा’

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : वर्ल्डकपचा फिव्हर उतरल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएल 2023 चे वेध लागले आहेत. येत्या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोची येथे मिनी लिलाव रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या मु्ंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी आपल्या करारमुक्त खेळाडूंची यादी कौन्सिलकडे सुपूर्द केली असल्याचे एक रिपोर्टनुसार सांगितले जात आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने आपला 'मॅचविनर' फलंदाज कायरन पोलार्ड याला करारमुक्त करत बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची माहिती आहे. रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वाद असल्याची चर्चा होती. पण जडेजाला चेन्नईच्या संघाने कायम ठेवले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या 5 खेळाडूंना यंदाच्या मिनी लिलावाच्या आधीच करारमुक्त केले आहे, तर सीएसकेच्या संघाने आपल्या 4 खेळाडूंना करारमुक्त केले असल्याची माहिती रिपोर्टस्नुसार देण्यात आली आहे. पॉवर हिटर कायरन पोलार्डला संघातून करारमुक्त करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबईसोबत आहे. पाचही विजेतेपदाच्या संघात त्याचा समावेश होता. त्याने आतापर्यंत 13 हंगामांत 147 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 412 धावा केल्या आहेत. मात्र 2022 मध्ये पोलार्डला 11 सामन्यांत केवळ 144 धावाच करता आल्या. त्यात त्याचा स्ट्राईक रेटही 107 होता. त्याचा संघाला फटका बसल्याने मुंबईने पोलार्डला करारमुक्त केल्याचे बोलले जात आहे.

पोलार्डसोबत मुंबई इंडियन्सने टायमल मिल्स, फॅबियन एलन, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पोलार्ड आणि मिल्स दोघे गेल्या हंगामात अपयशी ठरले. पण इतर तिघांना पुरेशी संधी मिळाली नाही. असे असले तरी आता या 5 जणांवर मिनी ऑक्शनमध्ये बोली लागणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, इशान किशन, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि डॅनियल सॅम्स यांना संघात कायम ठेवल्याची माहिती आहे.

सीएसकेने 4 खेळाडूंना दिला नारळ

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपला कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, मोईन अली आणि दीपक चहर या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे; तर इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन, तामिळनाडूचा फलंदाज एन. जगदीशन, न्यूझीलंडचा स्पिनर मिचेल सँटनर आणि वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्न या चौघांना करारमुक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT