स्पोर्ट्स

महाराष्ट्राला कुस्तीत सुवर्णासह तीन पदके

Shambhuraj Pachindre

पंचकुला : वृत्तसंस्था

ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या परफॉर्मन्सवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने आज सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. 55 किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. 53 किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्यपदक मिळवले. 65 किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.

महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी हरियाणातील आखाडा चांगलाच गाजवला. 55 किलो गटात वैभव पाटीलने केलेल्या कुस्त्या नेत्रदीपक ठरल्या. कल्याणीच्या कुस्त्यांनीही वाहवा मिळवली. मात्र, तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.

40 सेकंदांत चितपट

हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये नेहमीच टक्कर होत असते. याही स्पर्धेत टशन पहायला मिळाली. सुवर्ण आणि कांस्य पदकांसाठी या दोन राज्यांच्या पैलवानांमध्ये लढती झाल्या. 55 किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये वैभव पाटीलच्या कुस्तीने वाहवा मिळवली. त्याची अंतिम कुस्ती हरियाणाच्या सुरिंदरसोबत झाली. ही कुस्ती त्याने अवघ्या 40 सेकंदांत चितपट केली. सुरिंदरला डावपेच करण्यापूर्वीच वैभवने कुस्ती करून महाराष्ट्राचे वैभव वाढवले. पहिल्यांदा दस्ती ओढून दोन गुण घेतले आणि नंतर भारंदाज लावला आणि पट काढत त्याला चितपट केले.

अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक

अ‍ॅथलेटिक्स मैदानही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळाले होते. उद्या पाच ते सहा पदके मिळण्याचा आशावाद प्रशिक्षक जयकुमार टेंबरे यांनी व्यक्त केला. तर जलतरणातील आन्या वाला हिने दोन रौप्य पदके पटकाविले.

पाटीलने वाढविले कोल्हापूरचे वैभव

कोल्हापूरचा मल्ल वैभव पाटीलने शानदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या 25 व्या सुवर्णपदकाची भर घातली. 55 किलो वजन गटात त्याने हरियाणाचा मल्ल सुरेंदरला एकतर्फी लढतीत 8-0 ने पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अत्यंत चपळ असलेल्या वैभवने हरियाणाच्या खेळाडूला गुण घेण्याची एकही संधी दिली नाही.

पूर्वा सावंत हिची सुवर्ण उडी

दरम्यान, महाराष्ट्राच्या पूर्वा सावंत हिने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. 12.69 मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत राज्याच्या पदकांच्या संख्येत आणखी एका पदकाची भर घातली.

SCROLL FOR NEXT