स्पोर्ट्स

मध्य प्रदेशने मुंबईचा ६ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच पटकावले विजेतेपद

अमृता चौगुले

बंगळूर : वृत्तसंस्था :  बंगळूरच्या एम चिन्‍नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईचा 6 गडी राखून पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. शेवटच्या दिवशी मुंबईने मध्य प्रदेशसमोर विजयासाठी 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे संघाने 29.5 षटकांत पूर्ण केले. मध्य प्रदेशच्या या विजयाचे नायक यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार होते, ज्यांनी संघाला पहिल्या डावात शतकी आघाडी मिळवून दिली. या पदवीने मध्य प्रदेशने 67 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
मुंबईच्या पहिल्या डावात सर्फराज खानने शतकाच्या जोरावर 374 धावा केल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेत 536 धावा फलकावर लावत आणि त्याचवेळी सामन्यावर कब्जा केला. मध्य प्रदेशकडून यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतके झळकावली. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याने मुंबईचा संघ तुटला होता. दुसर्‍या डावात वेगवान धावसंख्येच्या प्रयत्नात मुंबईचा संपूर्ण संघ 269 धावांत गारद झाला. कुमार कार्तिकेयने 4 बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले. 108 धावांचे लक्ष्य एमपीने 30 व्या षटकाच्या एका चेंडूवर सहज पार केले. यादरम्यान हिमांशूने 37 तर शुभम आणि पाटीदारने 30-30 धावा केल्या. पाटीदारने विजयी शॉट मारला आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

पंडित यांना अश्रू अनावर

23 वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मला याच मैदानावर जेतेपद पटकावण्यात अपयश आले होते अन् आज प्रशिक्षक म्हणून मी रणजी करंडक नावावर केला, हे वाक्य आहे अश्रू अनावर झालेल्या चंद्रकांत पंडित यांचे. मध्य प्रदेशने रणजी करंडक 2022 च्या अंतिम सामन्यात मुंबईवर विजय मिळवून प्रथमच जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. 23 वर्षांपूर्वी याच चिन्‍नास्वामी स्टेडियमवर चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा संघ कर्नाटकविरुद्ध फायनलमध्ये हरला होता. तेव्हा अश्रूनयनांनी पंडित व सहकार्‍यांनी मैदान सोडले होते. पण, आज पंडित हे मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पहिले वहिले रणजी जेतेपद नावावर केले.

मुख्य प्रशिक्षक म्हणून
चंद्रकांत पंडित यांची कामगिरी

2003 साली मुंबईला जेतेपद

2004 साली मुंबईला जेतेपद

2016 साली मुंबईला जेतेपद

2018 व 2019 साली विदर्भला जेतेपद

2022 साली मध्य प्रदेशला जेतेपद

दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठून केली कमाल

रणजी ट्रॉफी 2021-22 च्या पहिल्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशने बंगाल संघाचा 174 धावांनी पराभव केला. मध्य प्रदेशचा संघ दुसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी 1998-99 मध्ये मध्य प्रदेशने केवळ एकदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या डावातही आघाडी घेतली, असे असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता

SCROLL FOR NEXT