स्पोर्ट्स

भारत दौरा, टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

Arun Patil

सिडनी ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आणि टी-20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सप्टेंबरमध्ये होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारत दौर्‍यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी कॅमेरून ग्रीनची भारत दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक 2022 साठी निवडलेला संघ जवळपास तसाच आहे, जो गेल्यावर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात खेळताना दिसला होता. एकच बदल म्हणजे, लेगस्पिनर मिचेल स्वेपसनच्या जागी टीम डेव्हिडला संधी देण्यात आली आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला हाच संघ सप्टेंबरच्या मध्यात भारत दौर्‍यात खेळणार आहे. मात्र, डेव्हिड वॉर्नरला भारत दौर्‍यातून विश्रांती देण्यात आली आहे. भारत दौर्‍यावर असलेल्या संघात त्याच्या जागी कॅमेरून ग्रीनचा समावेश करण्यात आला आहे.

भारत दौरा आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), टीम डेव्हिड, अ‍ॅश्टन एगर, जोश हेझलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा, कॅमेरून ग्रीन.

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍याचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाला भारत दौर्‍यावर 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, या मालिकेतील सामने 20, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी मोहाली, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची मोहीम सुरू होणार आहे. यावेळी आपले जेतेपद राखण्याची जबाबदारी गतविजेत्यांवर असेल. चांगली गोष्ट म्हणजे, यावेळीचा टी-20 विश्वचषक त्यांच्याच भूमीवर खेळला जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT