भालाफेकपटू नीरज चोप्रा 
स्पोर्ट्स

‘बाहुबली’ नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक! ‘वर्ल्ड ॲथलेटिक्स’ स्पर्धेत फडकावला तिरंगा (Video)

Neeraj Chopra Gold Medal : द. आफ्रिकेत सुवर्ण कामगिरी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neeraj Chopra Gold Medal : भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2025 च्या हंगामाची धमाकेदार सुरुवात केली. बुधवारी (दि. 17) दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे झालेल्या पॉट इन्व्हिटेशनल ट्रॅक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत त्याने 84.52 मीटर भालाफेक केली. तो सहा खेळाडूंमध्ये झालेल्या अंतिम फेरीत अव्वल स्थानावर तर द आफ्रिकेचा 25 वर्षीय डौव स्मिट (82.44 मीटर) दुस-या क्रमांकावर राहिला.

या स्पर्धेत निरजचे चोप्राचे प्रदर्शन त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्तम 89.94 मीटरपेक्षा कमी होते, तर स्मिट त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम 83.29 मीटरच्या जवळ पोहोचला. या दोनच खेळाडूंनी स्पर्धेत 80 मीटरचा टप्पा पार केला. द. आफ्रिकेचे आणखी एक भालाफेकपटू डंकन रॉबर्टसन याने 71.22 मीटरच्या प्रयत्नासह तिसरे स्थान मिळवले. निरज सध्या चेक प्रजासत्ताकचे जान जेलेजनी या आपल्या नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पोटचेफस्ट्रूममध्ये सराव करत आहे. त्याने 16 मे रोजी होणाऱ्या दोहा डायमंड लीगसाठी कंबर कसली आहे. तसेच मे महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर भालाफेक स्पर्धेतही भाग घेईल.

पॉच इन्व्हिटेशनल स्पर्धा 2025 भालाफेक निकाल

  • नीरज चोप्रा : 84.52 मीटर

  • डौ स्मित : 82.44 मीटर

  • डंकन रॉबर्टसन : 71.22 मीटर

  • आर्मंड विलेम्से : 69.58 मीटर

  • मार्क्स ऑलिव्हियर : 68.01 मीटर

  • जॅन-हेन्ड्रिक हेमन्स : 65.59 मीटर

दोहा डायमंड लीग स्पर्धेत निरजला कडवी झुंज द्यवी लागणार आहे. 2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये नीरजने 89.45 मीटरच्या भालाफेकीसह रौप्य पदक जिंकले होते, तर पाकिस्तानच्या अरशद नदीमने 92.97 मीटरचा नवा ऑलिंपिक विक्रम नोंदवत सुवर्ण पदक पटकावले होते.

90 मीटरचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात

नीरज चोप्राने 2020 टोकियो (सुवर्ण) आणि 2024 पॅरिस (रौप्य) ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकली आहेत. नीरजचा वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक 89.94 मीटर आहे. ही कामगिरी त्याने 2022 मध्ये केली होती. तो गेल्या काही काळापासून 90 मीटरचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत आहे. आता चेक प्रजासत्ताकच्या जान जेलेज्नी यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज आपली कामगिरी एका नव्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यास सज्ज झाला आहे.

1992, 1996 आणि 2000 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक विजेते असलेले जेलेज्नी हे भालाफेकीतील दिग्गज मानले जातात. आजवरच्या टॉप 10 सर्वोत्कृष्ट थ्रोमध्ये त्यांचे पाच थ्रो आहेत. 1996 मध्ये जर्मनीत त्यांनी 98.48 मीटरचा थ्रो करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनी चार वेळा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT