पुणे : पुढारी वृत्तसेवा
पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ एलो 2000 पेक्षा अधिक रेटिंग खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत अग्रमानांकित फारूक अमोनातोव्हने जबरदस्त कामगिरी करताना विजेतेपदाचा मान मिळविला.
या स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन कल्याणने क्षणाक्षणाला रंगतदार ठरलेल्या अखेरच्या 11 व्या फेरीतील डावात चतुर्थ मानांकित अलेक्सी फेडेरोव्हला पराभूत करून अग्रमानांकित अमोनातोव्ह आणि अलेक्सेज अलेक्झांड्रोव्ह यांच्याशी 8.5 गुणांसह बरोबरी साधली. या वेळी विजेतेपदाची चुरस कळसाला पोहचली होती. मात्र, टायब—ेकरमध्ये बाजी मारताना अमोनातोव्हने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले, तर अलेक्झांड्रोव्हने दुसरा क्रमांक पटकाविला. अर्जुन कल्याणला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले, तरी त्याची एकंदर कामगिरी नेत्रदीपक ठरली. त्याआधी अमोनातोव्ह आणि अलेक्झांड्रोव्ह यांच्यातील 11 व्या फेरीची लढत केवळ 14 चालींनंतर बरोबरीत सुटली.
विजेत्या ताझिकिस्तानच्या फारूक अमोनोतोव्हला करंडक व 3 लाख रुपये, तर उपविजेत्या बेलारूसच्या अलेक्सड्रोव्ह अलेक्सीजला करंडक व 2 लाख रुपये, अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय तिसरा क्रमांक पटकाविणार्या जीएम अर्जुन कल्याणला करंडक, 1 लाख 50 हजार रुपये, अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एआयसीएफचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व गिरीश चितळे, मानद सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.