स्पोर्ट्स

पोलंड फुटबॉल संघाच्या संरक्षणासाठी ‘एफ-16’ लढाऊ विमान तैनात

Arun Patil

दोहा, वृत्तसंस्था : कतारमध्ये होत असलेला फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्पर्धेतील सहभागी संघ एक एक करून कतारमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान, याच कालावधीत युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अजूनच तीव्र होत आहे. या दोन्ही देशांच्या सीमा लागून असलेला पोलंडला देखील या युद्धाची झळ पोहोचत आहे. रशियाचे मिसाईल पोलंडच्या सीमेत पडल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलंड आणि रशिया यांच्यात देखील तणाव निर्माण झाला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर पोलंडचा राष्ट्रीय फुटबॉल संघ कतारसाठी आज रवाना झाला. यावेळी पोलंड संघाला एफ-16 लढाऊ विमानांने संरक्षण पुरवले.

पोलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून त्याला 'आम्हाला पोलंडच्या दक्षिणेकडील सीमेवरून एफ – 16 लढाऊ विमानांनी संरक्षण दिले. वैमानिकांचे आभार,' असे कॅप्शन देखील देण्यात आले.

फिफा वर्ल्डकपमध्ये पोलंडचा समावेश ग्रुप 'सी' मध्ये करण्यात आला आहे. ते आपला पहिला सामना मेक्सिकोविरुद्ध खेळणार आहेत. रॉबर्ट लेवाँड्स्कीच्या नेतृत्वाखाली खेळणारा पोलंड 26 नोव्हेंबरला सौदी अरेबिया आणि त्यानंतर 30 नोव्हेंबरला अर्जेंटिनाशी भिडणार आहे. पोलंडचा संघ यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत दाखल होण्याचा प्रयत्न करेल. त्यांना 1986 नंतर फिफा वर्ल्डकपमध्ये बाद फेरी गाठता आलेली नाही.

SCROLL FOR NEXT