स्पोर्ट्स

पराभवाचा ‘हार्दिक’ बदला! पाकिस्तानसाठी शेर अकेला हि काफी है..!

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेवटच्या षटकापर्यंत श्‍वास रोखायला लावलेल्या रोमांचकारी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन चेंडू आणि पाच गडी राखून धुव्वा उडवला. या विजयाने भारताने विश्‍वचषक स्पर्धेतील झालेल्या पराभवाचा बदला घेतला. रविवारच्या या लढतीत विजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू हार्दिक पंड्या. त्याने फक्‍त १७ चेंडूंचा सामना करून ३३ धावा कुटल्या आणि पाकची मधली फळी कापून काढताना तीन बळीही घेतले.

आशिया चषकाच्या या सामन्यात हार्दिक पांड्याचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. पाकिस्तानला १५० धावाही करता आल्या नाहीत हा हार्दिक पांड्याच्या खेळाचा चमत्कार होता. या सामन्यात पांड्याने ३ बळी घेतले. पण विकेट्सच्या संख्येपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या गोलंदाजी जाेरावर पाकिस्तानच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

हार्दिक पांड्याने इफ्तिखार अहमदला पहिला बळी बनवला. हार्दिकचा चेंडू शॉर्ट पिच होता आणि इफ्तिखारने त्याला हुक मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इफ्तिखारच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे चेंडू बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात गेला.आणि पंड्याने इफ्तिखार आणि मोहम्मद रिझवान ही धोकादायक जोडी फोडली. या जोडीने ४५ धावांची भागीदारी केली.

हार्दिकने इफ्तिखारनंतर मोहम्मद रिझवानला आपला शिकार बनवले. हार्दिकचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या रेषेवर जात होता. रिझवानला हा चेंडू नीट समजू शकला नाही आणि तो हार्दिक पांड्याची दुसरी शिकार ठरला. थर्ड मॅनला थांबलेल्या आवेश खानने त्याचा झेल पकडला.
हार्दिकने मोहम्मद रिझवानला बाद केल्यानंतर दुसर्ऱ्याच चेंडूवर खुशदिलला झेल देण्यास भाग पाडले. हार्दिकचा हा चेंडू खुशदिलच्या छातीच्या उंचीवर होता त्याने शॉट मारला परंतू कव्हरला थांबलेल्या रवींद्र जडेजाने त्याचा सोपा झेल घेतला.

गोलंदाजी पाठोपाठ हार्दिकने फलंदाजीतही १७ चेंडूंत ३३ धावांची महत्वपुर्ण कामगिरी केली. भारताला विजयासाठी १२ चेंडूत २१ धावा असे समीकरण आले. हरिस रौफला हार्दिक पंड्याने तीन खणखणीत चौकार ठोकले. या षटकांत १४ धावा निघाल्याने शेवटच्या षटकांत ७ धावा विजयासाठी हव्या होत्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद नवाझने जडेजाचा त्रिफळा उडवला. आणि हार्दिकने विजयी षटकार ठोकत विजयाची औपचारीकता पुर्ण केली.

SCROLL FOR NEXT