स्पोर्ट्स

पदकाच्या शर्यतीत अविनाश साबळेला अपयश

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी सकाळी भारताच्या पदक मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला. 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याला पदक जिंकण्यात अपयश आले. अंतिम फेरीत अविनाशला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. बीड जिल्ह्यातील अविनाशने पात्रता फेरीत 8.18.44 इतक्या वेळेसह पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

अंतिम फेरीत अविनाशने 8.31.75 इतका वेळ घेतला आणि तो 11व्या स्थानावर राहिला. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. याआधी 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेत अविनाशने 13 वे स्थान मिळवले होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करणार्‍या अविनाशला अंतिम फेरीत ती लय कायम ठेवता आली नाही. ऑक्टोबर 2019 नंतरची ही त्याची सर्वात संथ कामगिरी ठरली.

फायनलमध्ये मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कलीने 8.25.13 वेळेसह सुवर्णपदक जिंकले. इथोपियाच्या खेळाडूने रौप्य तर केनियाच्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.

अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम केला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिम्पिकच्या आधी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत देखील अविनाशने मोठे यश मिळवले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. अविनाश हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे.

फ्रेजर-प्राईस सर्वात वेगवान महिला धावपटू

युजीन (अमेरिका) : वृत्तसंस्था : जमैकाच्या शेली-अ‍ॅन फ्रेजर-प्राईसने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेतील हे तिचे पाचवे सुवर्णपदक ठरले. जमैकाच्या धावपटूंनी या शर्यतीवर वर्चस्व गाजवताना रौप्य आणि कांस्य पदकेही आपल्या नावे केली.

35 वर्षीय फ्रेजर-प्राईसने 10.67 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. यासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम वेळेचा विक्रम आपल्या नावे केला. तिने 1999 मध्ये मेरियन जोन्सने (10.70 सेकंद) स्थापित केलेला विक्रम मोडीत काढला. प्राईसने यापूर्वी 2009, 2013, 2015, 2019 मध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.

SCROLL FOR NEXT