स्पोर्ट्स

देशात खेळासाठी सकारात्मक वातावरण : क्रीडामंत्री ठाकूर

दिनेश चोरगे

भोपाळ; वृत्तसंस्था :  देशामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांत खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे. आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय क्रीडा व युवक मंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे केले.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे येथील तात्या टोपे क्रीडा संकुलात अतिशय शानदार सोहळ्यात श्री. ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी राज्याच्या क्रीडामंत्री यशोधराराजे शिंदे, केंद्रीय क्रीडा व युवक खात्याचे राज्यमंत्री नितीश प्रमाणिक हे उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन जाहीर झाल्याची औपचारिक घोषणा करीत मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये अनेक खेळांसाठी वेगवेगळ्या अकादमी सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंचे क्रीडानैपुण्य ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आहेत. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणही दिले जात आहे. जागतिक स्तरावर चमक दाखवणार्‍या खेळाडूंना भरघोस शिष्यवृत्तीही सुरू करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणार्‍या खेळाडूंनाही राज्य शासनातर्फे रोख पारितोषिके दिली जात आहेत. यावेळी अविनाश साबळे व निखत झरीन यांनी आणलेली क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यशोधराराजे शिंदे यांनी स्वागत केले.

SCROLL FOR NEXT