स्पोर्ट्स

कुस्तीत पदकांचा पाऊस; तीन ‘सुवर्ण’सह एक ‘रौप्य’; दोन कांस्यपदक

मोहन कारंडे

बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या मल्लांचा डंका वाजला. भारताच्या दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकला सुवर्णपदक, तर अंशू मलिकला रौप्यपदक मिळाले. दीपकने पाकिस्तानच्या मुहम्मद इनाम याला हरवले, तर बजरंगने कॅनडाच्या लॅचलीन मॅक्नेलवर विजय मिळवला. साक्षीने कॅनडाच्या अ‍ॅना गोडिनेझ गोंझालेझचा पराभव केला. नायजेरियाच्या ओडूनायोकडून पराभूत झाल्याने अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दिव्या काकराननेदेखील 68 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. याशिवाय मोहित ग्रेवालनेही कांस्यपदक आपल्या नावावर केले.

सुवर्ण'साक्षी'

रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती साक्षी मलिकने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत राष्ट्रकुल पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. तिने कॅनडाच्या अ‍ॅना गोडिनेझ गोंझालेझचा पराभव केला. पहिल्या फेरीत साक्षी 0-4 ने पिछाडीवर होती. मात्र, दुसर्‍या डावात साक्षीने पिन फॉल डाव टाकत थेट सुवर्णपदकालाच गवसणी घातली.

साक्षी मलिकने अ‍ॅनाविरुद्ध पहिल्यांदा आक्रमक डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पाय पकडून अ‍ॅनाला खाली घेण्याचा प्रयत्न करताना साक्षीचा डाव तिच्यावरच उलटला आणि अ‍ॅनाने दोन गुण मिळवले. अ‍ॅनाने टेक डाऊन डाव खेळत पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात अ‍ॅना गोंझालेझने साक्षी मलिकवर 4 गुणांची आघाडी मिळवली. दुसर्‍या सत्रात मलिकने टेक डाऊनचे दोन गुण मिळवले. त्यानंतर तिने पिन फॉल डाव टाकत थेट सुवर्णपदक पटकावले.

अंशूला रौप्य

महिला फ्री स्टाईल कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू अंशू मलिकचा नायजेरियाच्या ओडूनायोने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, अंशू मलिकचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पण आहे. अंशूने आपले सलग दोन सामने तांत्रिक सरसतेच्या जोरावर जिंकत फायनल गाठली होती. पहिल्या सत्रात नायजेरियाच्या ओडूनायोने दोन-दोन असे एकूण चार तांत्रिक गुण पटकावले. पहिल्याच सत्रात पिछाडीवर पडलेल्या अंशूने दुसर्‍या सत्रात मात्र मुसंडी मारत पहिल्यांदा 1 व त्यानंतर 2 असे एकूण तीन तांत्रिक गुण पटकावले. मात्र, नायजेरियाच्या ओडूनायोने याच सत्रात 3 गुण घेत सामना 7-3 असा जिंकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT