स्पोर्ट्स

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौर्‍यावर

Arun Patil

रावळपिंडी : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानात दाखल झाला आहे. या दौर्‍यात ऑस्ट्रेलिया पाकिस्तानबरोबर तीन कसोटी, तीन वन-डे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. मालिकेचा पहिला सामना 4 मार्चपासून रावळपिंडीत सुरू होईल तर दौर्‍याची सांगता 5 एप्रिलला होईल.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 1998 मध्ये पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडही पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेट रूळावर आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. मात्र, या दौर्‍यावर दहशतवादाचे सावट कायम असणार आहे.

पाकिस्तान दौर्‍यावर असणार्‍या श्रीलंकेच्या संघावर 2009 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटला ब्रेक लागला. अनेक संघ पाकिस्तानात जाण्याचे टाळत होते. त्यामुळे पाकिस्तानला अनेक देशांबरोबर त्रयस्त ठिकाणी सामने खेळावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने देखील पाच वर्षांपूर्वी लाहोरमधील चर्चवर आत्मघातकी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मायदेशात क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी कंबर कसली.

अनेक छोट्या संघांचा दौरा पाकिस्तानने यशस्वी करून दाखवला. काही महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव अर्ध्यावर सोडला होता. पण, आता सर्व भीती मागे टाकून ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानात पोहोचला आहे; परंतु या संघातून अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे.

SCROLL FOR NEXT