स्पोर्ट्स

ऑलिम्पिक वीरांचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्‍लोषी स्वागत

Arun Patil

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था : टोकियो ऑलिम्पिक मध्ये इतिहास घडवून नीरज चोपडासह इतर भारतीय खेळाडू सोमवारी मायदेशी परतले. नवी दिल्‍लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या वीरांचे जल्‍लोषात स्वागत करण्यात आले.

भालाफेकीत देशाला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या नीरज चोपडाचे आई, वडील त्याच्या स्वागताला विमानतळावर हजर होते. नीरजने त्यांना अभिवादन केले. यावेळी नीरजने आपले सुवर्णपदक आधी आईच्या आणि नंतर वडिलांच्या गळ्यात घातले. हा क्षण उपस्थितांसाठी भावनाविवश करणारा होता.

नीरजसह अ‍ॅथलेटिक्सचा संघ, कुस्तीपटू रवी दहिया, बजरंग पुनिया, महिला हॉकी संघाचे खेळाडू यांचेही आगमन झाले. उपस्थित लोकांच्या हातात तुम्ही देशाचे हीरो आहात, अशा घोषणेचे फलक होते.

विमानतळावर बँडपथक, ढोल-ताशे यांचा गजर सुरू होता. या सर्वांच्या आकर्षणाचा केंंद्रबिंदू होता तो नीरज चोपडा. चाहत्यांनी, नातेवाईकांनी त्याच्याभोवती गराडा घातला होता. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या हेदेखील नीरजच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते.

त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदामंत्री व माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे पदक सर्व देशाचे आहे, असे यावेळी नीरज चोपडाने सत्काराला उत्तर देताना सांगितले. पी. व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू या सोहळ्याला उपस्थित नव्हत्या.

SCROLL FOR NEXT