नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात बीसीसीआय संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना निवडण्यात येण्याची शक्यता कमी असून, आयर्लंडविरुद्ध निवडलेला युवा संघच इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 26 व 28 जून रोजी या दोन लढती झाल्यानंतर भारतीय संघ लंडनमध्ये दाखल होईल. इंडियन प्रीमिअर लीग 2022 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे विश्रांतीवर होते आणि आता ते थेट इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत.
यंदाचे वर्ष ट्वेंटी-20 वर्ल्डकपचे असल्याने या सीनिअर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळताना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ही इच्छा इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती; पण रोहित, विराट, जसप्रीत आदी सीनिअर खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
एका वृत्तानुसार, आयर्लंडविरुद्ध निवडलेला संघच इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे. 1 ते 5 जुलै या कालावधीत पाचवी कसोटी बर्मिंगहॅम येथे होणर आहे. त्यानंतर दोन दिवसांत टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 7 जुलैपासून साऊदहॅम्पटन येथे सुरू होणार्या टी-20 मालिकेत कसोटी संघातील खेळाडूंना लगेच खेळवणे अवघड आहे आणि तेही इतक्या कमी कालावधीत. अशा परिस्थितीत आयर्लंडविरुद्धचा टी-20 संघच इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळले, असे सूत्रांनी सांगितले आहे.
दीपक चहर इंग्लंड टी-20 मालिकेलाही मुकणार
बंंगळूर : वृत्तसंस्था : भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहर अजूनही तंदुरुस्त झालेला नाही आणि त्यासाठी त्याला किमान 5 आठवडे लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दुखापतीतून सावरण्यासाठी तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता. वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत चहरला ही दुखापत झाली होती; पण तो अजूनही तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड होणे अशक्यच आहे; पण ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी तंदुरुस्ती सिद्ध करण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.
'एनसीए'ने दिलेल्या रिहॅब कार्यक्रमानुसार, मी एकावेळी 4-5 षटके गोलंदाजी करतोय… मी दुखापतीतून सावरतोय आणि पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी मला आणखी 4-5 आठवडे लागतील, असे मत चहरने व्यक्त केले. 29 वर्षीय चहर आता 'एनसीए'मध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौर्यातून तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याच्या हाताची दुखापत बरी झाली असून, तो लेईसेस्टर क्लबकडून कौंटी खेळणार असल्याचे समजते आहे.