लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडने तिसर्या कसोटीत न्यूझीलंडवर 7 विकेटस् राखून विजय मिळवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. ऑली पोप, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी दुसर्या डावात अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडला हा विजय मिळवून दिला. बेअरस्टोने 44 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावांची आक्रमक खेळी केली. जो रूटने नाबाद 86 धावा करताना संघाचा विजय पक्का केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या किवींना पराभूत केल्यानंतर इंग्लंडचा संघ टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. 1 ते 5 जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना होणार आहे.
किवींच्या पहिल्या डावातील 329 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची अवस्था 6 बाद 55 अशी झाली होती; पण जॉन बेअरस्टो (162) व पदार्पणवीर जेमी ओव्हर्टन (97) यांनी डाव सावरला. स्टुअर्ट ब्रॉडनेही 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना इंग्लंडला 360 धावांपर्यंत मजल मारून दिली.
किवींचा दुसरा डाव 326 धावांवर गडगडला. पहिल्या डावात 5 विकेटस् घेणार्या जॅक लिचने दुसर्या डावातही त्याची पुनरावृत्ती केली. दुसर्या डावात अॅलेक्स लीस (9) व झॅक क्रॅव्हली (25) यांना अपयश आल्यानंतर ओली पोप व जो रूट यांनी डाव सावरला. या दोघांनी 134 धावांची भागीदारी केली. पोप 108 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 82 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या जॉनी बेअरस्टोने 30 चेंडूंत अर्धशतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. ईयान बॉथम यांनी 1981 मध्ये दिल्ली कसोटीत भारताविरुद्ध 28 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. 1986 मध्ये बॉथम यांनी ओव्हल कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 32 चेंडूंत 50 धावा केल्या होत्या.
हेही वाचा