स्पोर्ट्स

अश्विनला कोरोना; इंग्लंड दौर्‍यासाठीचे प्रयाण लांबले

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंग्लंड दौर्‍यासाठी निवड झालेल्या कसोटी संघातील रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तो अजून भारतातच आहे, त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला जाऊ शकेल.

गेल्यावर्षी कोरोनामुळे अर्धवट सोडलेली कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. 1 जुलै ते 5 जुलै या काळात भारत आणि इंग्लंडदरम्यान एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी 24 जूनपासून भारतीय संघ लिसेस्टरशायर येथे चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी ही वाईट बातमी आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले असून, त्यांचा जोरदार सराव सुरू आहे; पण कोविड-19 मुळे अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अजूनही भारतातच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला याबाबत माहिती दिली. सध्या अश्विन क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला जाऊ शकेल.

सूत्राने असेही सांगितले की, कोरोनाची लागण झाल्यामुळे अश्विन लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अश्विनव्यतिरिक्त उर्वरित संघ लंडनला पोहोचला आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी आलेली आहे. परदेशी भूमीवर प्रथमच कर्णधारपद भूषवणार्‍या रोहित शर्माला के. एल. राहुलची उणीव भासेल. या जोडीने भारताला या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. यापूर्वी झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 368 धावा केल्या होत्या, तर राहुलने एक शतक आणि अर्धशतकासह 315 धावा केल्या होत्या.

के. एल. राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शर्मा आणि गिल इंग्लंडविरुद्ध सलामी करताना दिसतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वी संघाला रविचंद्रन अश्विनच्या आगमनाची प्रतीक्षा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT