पुणे; वृत्तसंस्था : पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत कर्णधार के. एच. प्रज्वल आणि सचिन भार्गो यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तेलगू योद्धाज् संघाने मुंबई खिलाडीज् संघाला 12 गुणांच्या फरकाने पराभूत करून गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रज्वलने कर्णधाराला साजेशी खेळी करताना 3 मिनिटे 1 सेकंद संरक्षण केले, तर भार्गोने अष्टपैलू कामगिरी बजावताना आक्रमणात 10 गुण व संरक्षणात 3 मिनिटे 47 सेकंद अशी कामगिरी केल्यामुळे तेलगू योद्धाज् संघाला मुंबई खिलाडीज् संघावर 55-43 असा विजय मिळवता आला. रोहन शिंगाडे आणि आदर्श मोहिते यांनी अनुक्रमे 11 आणि 9 गुणांची कमाई करताना तेलगू योद्धाज्च्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मुंबई खिलाडीज् संघाकडून या मौसमातील सर्वोत्तम संरक्षक दुर्वेश साळुंखे याने पहिल्या डावातील 2 मिनिटांसह एकूण 5 मिनिटे 11 सेकंद संरक्षण करतानाच आक्रमणात 6 गुण नोंदवून कडवी झुंज दिली. अविक सिंग याने 8 गुणांची कमाई करताना त्याला उत्तम साथ दिली. मात्र, ही जोडी मुंबईचा पराभव टाळू शकली नाही. या विजयाबरोबरच तेलगू योद्धाज् संघाने गुजरात जायंटस् संघाला (10 गुण) मागे टाकून 12 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. तरीही गुजरात जयंटस् संघाला आज रात्री चेन्नई क्विक गन्सवर मात करून पुन्हा आघाडीचे स्थान मिळवण्याची संधी आहे. बुधवारी, 24 ऑगस्ट 2022 रोजी चेन्नई क्विक गन्सविरुद्ध ओडिशा जुगरनटस् यांच्यात पहिला सामना, तर दुसरा सामना मुंबई खिलाडीज्विरुद्ध राजस्थान वॉरियर्स यांच्यात होणार आहे.