मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत झिम्बाब्वे संघाने आपल्या विस्मयकारक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या झिम्बाब्वेने ग्रुप स्टेज सामन्यांत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून खळबळ उडवून दिली आहे. या ऐतिहासिक यशानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून, त्यांनी आता भारतीय संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी मोठे विधान केले आहे.
झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी 'सुपर-८' फेरीतील भारतासोबतच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वृत्तसंस्था 'पीटीआय'च्या हवाल्यानुसार, इब्राहिम म्हणाले की, ‘‘गुणतालिका आणि इतर मापदंडांनुसार आम्हाला 'अंडरडॉग' मानले जात असेल, तर त्यात आम्हाला काहीच अडचण नाही. उलट, या बिरुदामुळे संघ अधिक सहजतेने खेळू शकतो. या विश्वचषकाच्या सुरुवातीलाही आम्ही आमच्या गटात 'अंडरडॉग' म्हणूनच उतरलो होतो आणि आम्हाला तशाच स्थितीत खेळायला आवडते.’’
झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकांनी स्पष्ट केले की, मोठ्या संघांविरुद्ध खेळताना त्यांच्यावर कोणतेही दडपण नसते. ते म्हणाले, ‘‘आमचा कर्णधार सिकंदर रझानेही काही दिवसांपूर्वी उल्लेख केला होता की, 'अंडरडॉग' असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आम्ही कोणत्याही दबावाशिवाय मैदानात उतरतो. सर्व दबाव भारतीय संघावर असेल, कारण ते त्यांच्या घरच्या मैदानावर आणि परिचयाच्या परिस्थितीत खेळत आहेत. भारत हा या फॉरमॅटमध्ये सातत्याने सुधारणा करणारा प्रबळ संघ आहे.’’
इब्राहिम पुढे म्हणाले की, ‘‘आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे असेल की, सामन्याच्या महत्त्वामुळे किंवा मैदानावरील प्रचंड गर्दीमुळे संघाने गडबडून जाऊ नये. विशेषतः जेव्हा भारतीय संघ लयीत असतो, तेव्हा त्यांना रोखणे कठीण असते. मात्र, आम्ही या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. नियोजनाच्या बाबतीत आम्ही सर्व योग्य पावले उचलली आहेत.’’
या विश्वचषकातील झिम्बाब्वेच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, त्यांनी साखळी फेरीत खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे, तर आयर्लंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. झिम्बाब्वेने सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत करून मोठा उलटफेर केला आणि त्यानंतर साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर ६ गडी राखून मात करत 'सुपर-८' मध्ये दिमाखात प्रवेश केला.