लखनौ; वृत्तसंस्था : भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि क्रिकेट विश्वचषक विजेता झहीर खान इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) लखनौ सुपर जायंटस् (एलएसजी) संघाच्या मार्गदर्शक (मेंटॉर) पदावरून पायउतार होण्याची दाट शक्यता आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, केवळ एका हंगामासाठी संघासोबत काम केल्यानंतर झहीर आणि संघ व्यवस्थापन फारकत घेण्याच्या मार्गावर आहेत. ‘आयपीएल 2025’मध्ये संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
एका वृत्तानुसार, ‘एलएसजी’चे मालक संजीव गोयंका यांचा ‘आरपीएसजी’ ग्रुप लवकरच ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ या नव्या पदाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. या पदावरील व्यक्तीकडे केवळ लखनौ सुपर जायंटस्च नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेतील ‘दरबान जायंटस्’ आणि ‘द हंड्रेड’ लीगमधील ‘मँचेस्टर ओरिजिनल्स’ या भगिनी फ्रँचायझींच्या वर्षभराच्या विकासाची आणि कामगिरीवर देखरेख ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. संघांच्या संरचनेत अधिक व्यावसायिकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे समजते.
‘आयपीएल 2025’मध्ये लखनौ संघाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली होती. संघाने 14 सामन्यांपैकी केवळ 6 सामने जिंकले आणि गुणतालिकेत सातव्या स्थानी राहिल्याने त्यांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. झहीर खान ‘आयपीएल 2025’च्या मेगा लिलावापूर्वी संघाशी मार्गदर्शक म्हणून जोडला गेला होता. मॉर्ने मॉर्केलने संघ सोडल्यानंतर त्याने गोलंदाजी प्रशिक्षकाची अतिरिक्त जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली होती.